निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प, जयंत पाटील यांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामान यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. ”हा अर्थसंकल्प निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला आहे”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

पाटील यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत अर्थसंकल्पावर टीका केली. ”केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो. अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅब मध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

त्या सोबतच त्यांनी ”देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही.निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असा हा अर्थसंकल्प आहे”, अशा शब्दात त्यांनी सरकारला फटकारले आहे.