…म्हणूनच मोदीजी तुम्ही फोडलेले, चोरलेले पक्ष सोबत घेतले

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा हे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे, असा गळा महाराष्ट्रात येऊन काढत आहेत. मात्र ठाकरेंची शिवसेना ही खरी आहे, हे सर्व महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला माहिती आहे. जेव्हा ओरिजिनल शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा भाजपला पक्ष फोडावे आणि चोरावे लागत नव्हते. आता चोरलेली शिवसेना सोबत असतानाही तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस का फोडावी लागली, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपस्थित करून भाजपवाल्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचे रडगाणे गाण्यास सुरुवात केली आहे. याच रडगाण्यावरून शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी भाजपच्या केंद्रातील नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ओरिजिनल शिवसेना तुमच्या सोबत होती तेव्हा तुम्हाला अशा फोडलेल्या पक्षांची गरज कधीच भासत नव्हती. आता एक पक्ष चोरला तरी दुसरा पक्ष फोडण्याची नामुष्की तुमच्यावर आली आहे. ओरिजिनल शिवसेनेचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे तुमची अवस्था दयनीय झाली आहे, असे ट्विट केदार दिघे यांनी करून भाजपच्या बिनबुडाच्या आरोपांची हवा काढून घेतली.