जम्मू-कश्मिरात भूस्खलन, रामबनमध्ये वाहतूक ठप्प

जुलैअखेरीस देशभरात पावसाने हाहाकार उडल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यांत धुवांधर सुरुवात झाली. उत्तर हिंदुस्थानासह सर्वत्र पावसाच्या हजेरीने पाण्याची चिंता मिटली. जम्मू-कश्मीरच्या रामबनमध्ये पावसाने भूस्खलन झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने ढिगारा हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे काम सुरू केले. उत्तराखंडमधील नैनितालमधील धनगढी पुलावरून ओव्हरफ्लो नाला वाहत असताना पुलावरून जाणारी बस उलटली. बसमधील 35 प्रवाशांना जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. राजधानी दिल्लीत पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

केंद्रीय हवामान विभागाने देशातील 18 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात बकिया बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे रेवा येथील तराई भागात पुराचा धोका वाढला आहे. येथे होमगार्ड आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशात राज्याच्या पूर्व भागात मान्सून प्रणालीची सक्रियता असून, दोन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. जबलपूर येथील बरगी धरणातून पाणी सोडल्याने नर्मदेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नर्मदापूरममधील सेठानी घाटातील पाण्याची पातळी शनिवारी 956 फुटांवर गेली होती.

बिहारमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून, राजधानी पाटणासह बिहारच्या 10 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 9 ऑगस्टपर्यंत उत्तर बिहारवर मान्सून बरसणार असून, मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हरयाणात हवामान खात्याने ६ जिल्ह्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. अन्य 16 जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. 9 ऑगस्टपर्यंत मान्सून कमकुवत स्थितीत राहील. 10 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात दमदार पावसाची प्रतीक्षा
जुलै महिन्यांत हिंदुस्थानात पावसाने जबरदस्त पुनरागमन केल्याने उष्णता कमी झाली. मात्र, महाराष्ट्रात या आठवड्यात विश्रांती घेतली असून, काही भागांत रिमझिम पाऊस सुरू आहे. विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा दिसून येत आहे. शेतकर्‍यांनी पेरणी केल्यानंतर आता चातक पक्ष्यासारखी वाट पाहणे सुरू केले आहे. खरिपाची पिके आता शेवटची घटका मोजत असून, विहीर, तलाव कोरडे पडले आहे.