ईडीच्या भीतीने नेते पक्ष सोडताहेत, अशोक गेहलोत यांचा निशाणा

राजस्थानात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहीले आहेत. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र, अद्यापी काँग्रेसमधून अनेक नेते भाजपामध्ये उडय़ा घेत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या भितीनेच हे नेते पक्ष सोडत आहेत. अशा शब्दांत काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी एएनआयशी बोलताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

ईडी, सीबीआयचा ससेमीरा मागे लावून नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे पुढे काय होणार अशी भीती अनेक नेत्यांना वाटत असल्याचे गेहलोत म्हणाले. मात्र, आम्ही सत्तेत राहिलो किंवा नसलो तरीही काँग्रेसची जी विचारधारा आहे ती काँग्रेस कधीच सोडणार नाही, असेही ते म्हणाले. देश आणि काँग्रेसचा डीएनए एकच असून शेवटी देशाला काँग्रेसकडेच पहावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानतंर राजस्थानसह विविध राज्यांमध्ये अनेक काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याबाबत गेहलोत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रीया दिली.