Lok Sabha Election 2024 : कांदा निर्यातबंदीवरून शेतकरी आक्रमक , ‘तुम्हाला मतदान करायचे की नाही, आता आम्ही ठरवू’

कांदा निर्यातबंदी करणाऱया व कांदा प्रश्नावर आवाज न उठविणाऱया लोकप्रतिनिधींना मतदान करायचे की नाही हे आम्ही ठरवणार, असा इशारा देत देवळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

कांदाप्रश्नी केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मातीमोल भावामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याचा निषेध करीत मार्च 2023 मध्ये देवळा तालुक्यातील माळवाडी येथील शेतकऱयांनी गाव विक्रीला काढून आपला संताप व्यक्त केला होता. त्यांच्या या आंदोलनाकडे सत्ताधारी व विरोधी लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली होती. आता पेंद्र सरकारने कांद्यावर गेल्या काही महिन्यांपासून निर्यातबंदी आणली आहे. यामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. कांदा पिकाशी संबंधित घटकांची मोठी भाववाढ झाली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. शिक्षण, आरोग्य महागले आहे. शेतकऱयांचे जगणे मुश्कील झाले आहे, असा संताप माळवाडी येथील शेतकऱयांनी व्यक्त केला.

शेतकरी आक्रमक झाल्याने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार, केंपेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, भाजपा उमेदवार भारती पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. निर्यातबंदीच्या विरोधात घोषणाबाजी करीत शेतकऱयांनी निदर्शने केली. यावेळी सरपंच मयूर बागुल, खुशाल बागुल, किशोर बागुल, दिलीप शेवाळे, शशी शेवाळे, अविनाश बागुल, नाना सोनवणे, प्रतीक बागुल, जिभाऊ शेवाळे, अमोल बागुल, आबा गुंजाळ, राहुल बागुल आदी हजर होते.