Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार, विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

हातात मशाल… भगवा जल्लोष… विनायक राऊत तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा जोरदार घोषणा आणि शक्तिप्रदर्शन करीत महाविकास आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मी सर्वाधिक मताधिक्याने निवडून येईन, असा आत्मविश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.

खासदार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मराठा सभागृहामध्ये महाविकास आघाडीचा एक मेळावा झाला. या मेळाव्याला शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, उपनेते आमदार राजन साळवी, लक्ष्मण वडले, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप बोरकर, राजेंद्र महाडिक, उपनेते अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटये, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, आपचे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, विवेक ताम्हणकर, माजी मंत्री रवींद्र माने, प्रवीण भोसले, माजी आमदार हुस्नबानू खलिपे, सुभाष बने, महिला संघटक नेहा माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सर्वाधिक मताधिक्य राजापुरातून देणार

मराठा सभागृहातील मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती. शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता. यावेळी उपनेते आमदार राजन साळवी आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत मोठय़ा मताधिक्याने निवडून येणारच आहेत. पण ते राजापूर विधानसभा मतदारसंघातून असेल, असे ठणकावून सांगितले. त्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असे म्हणून चिपळुणातून सर्वाधिक मताधिक्य देण्याची घोषणा केली.