Lok Sabha Election 2024 :पटोले, पटेल यांची प्रतिष्ठा पणाला, सुनील मेंढे व प्रशांत पडोळे यांच्यात थेट लढत

> महेश उपदेव

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर कॉँग्रेसकडून डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट लढत होणार असली तरी भाजप आणि कॉँग्रेसचे बंडखोर निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. मेंढे आणि पडोळे प्रत्यक्षात निवडणूक लढत असले तरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची या निवडणुकीत खऱया अर्थाने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विद्यमान खासदार सुनील मेंढे गेली पाच वर्षं निष्क्रिय होते. त्याच्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांना मिळू शकतो. राहुल गांधी यांच्या सभेमुळे काँग्रेसमध्ये चैतण्याचे वातावरण आहे, हा टेम्पो शेवटपर्यंत टिकविण्याची जबाबदारी नाना पटोले यांच्या टीमवर आहे. सुनील मेंढेंकरिता अमित शहा यांची सभा होत असून मतदार कोणाच्या पारडय़ात काwल टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉँग्रेसचे नाना पटोले यांनी भाजपमध्ये असताना राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचा याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. हे दोघे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात नसले तरी पटोले आणि पटेल या मतदारसंघात ठाण मांडून बसले असून खरी लढत या दोन नेत्यांमध्येच आहे. डॉ. प्रशांत पडोळेंकरिता जमेची बाजू म्हणजे त्यांचे वडील स्व. यादवराव पडोळे भंडारा येथील सहकार महर्षी होते, त्यांनी अनेक युवकांना रोजगार मिळवून दिला असल्यामुळे अनेक लोक स्वतःहून डॉ. पडोळे यांना मदत करण्यास पुढे येत आहेत.

सामाजिक आणि जातीय समीकरण महत्त्वाचे
आजवर झालेल्या निवडणुकांत तेली-कुणबी-पोवार असे उमेदवार दिले गेले. पण या वेळी प्रमुख दोन्ही उमेदवार कुणबी आहेत. मतदारसंघातील सामाजिक आणि जातीय समीकरण महत्त्वाचे असून तेली, पोवार, दलित मते कोणाच्या पारडय़ात पडतात त्यावरच विजयी उमेदवाराचे भविष्य अवलंबून आहे. तेली समाजाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.

– खासदार म्हणून मेंढे गेली पाच वर्षं निष्क्रिय होते. त्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या अँटीइंकपन्सीचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

– गेल्या 15 वर्षांत मतदारसंघात एकही मोठा उद्योग आला नाही, त्यामुळे युवकांना रोजगारासाठी बाहेर भटकावे लागत आहे. रखडलेला भेलचा प्रकल्प प्रचाराचा मुद्दा आहे.
– औद्योगिक विकासात मतदारसंघ बराच मागे आहे. धान उत्पादक जिल्हा म्हणून भंडारा-गोंदिया प्रसिद्ध आहे. प्रकल्प आणण्यात लोकप्रतिनिधी खूप मागे आहेत.