Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंना साताऱयातून तिकीट, नारायण राणे वेटिंगवरच

भाजपने सातारा मतदारसंघातून आज उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. साताऱयातील तिढा महायुतीने सोडवला असला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील तिढा अद्याप कायम आहे. उदयनराजेंना तिकीट देणाऱया भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून इच्छुक असलेल्या नारायण राणे यांना मात्र वेटिंगवर ठेवल्याने राणेंची धडधड वाढली आहे.

सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नव्हते. कारण या तीनही जागांवर महायुतीमधील भाजपसह अजित दादा पवार आणि मिंधे गटाने दावा केला आहे. साताऱयाच्या जागेवर भाजपने उदयनराजेंना उमेदवारी दिल्यानंतर त्या मतदारसंघाचा प्रश्न मिटला आहे, परंतु इतर दोन मतदारसंघांमधील रस्सीखेच सुरूच आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून मिंधे गटाचे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यास इच्छुक आहेत. नुकतीच त्यांनी नागपूर येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. आज भाजपने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारी यादीमध्येही राणेंचे नाव नसल्याने राणेंचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.