बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह कोकण, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. तसेच तलाव क्षेत्रातही पाऊस होत असल्याने जलपातळी वाढली आहे. आता पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याआधी हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता असून बुधवारसाठी अलर्ट जारी केला होता. पुढील दोन दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात सोमवारी संध्याकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य दिशेने सरकणाऱ्या या क्षेत्रासोबतच अरबी समुद्रात दक्षिण कोकण ते उत्तर केरळपर्यंत किनारपट्टी भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे क्षेत्रही महाराष्ट्राजवळ प्रभावशाली आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारसाठी आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी पालघर, ठाण्यासह मुंबईतही ऑरेंज अलर्ट कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.