मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी, दिल्लीत ‘मधुरव बोरू ते ब्लॉग’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग

मराठी भाषेच्या जन्माची संगीतमय कहाणी असे स्वरूप असलेला ‘मधुरव बोरू ते ब्लॉग’चा 25 वा (रौप्यमहोत्सवी) प्रयोग दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात होणार आहे. कार्यक्रम 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार असून दिल्ली मराठी प्रतिष्ठानने आयोजन केले आहे.

मराठी भाषेचा जन्म कसा झाला, मराठी भाषेचा रंजक इतिहास आणि त्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे मधुरा वेलणकर, तिचे सहकलाकार नाटय़-नृत्य-संगीत मनोरंजनाच्या माध्यमातून या कार्यक्रमातून सादर करतात. मराठी भाषेतला किंवा मराठी नाटय़ क्षेत्रातला हा एक अभिनव प्रयोग इतक्या मर्यादित दृष्टीने या कार्यक्रमाकडे न पाहता मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा यासाठी मराठीची माहिती, मराठीची महती कळावी आणि मराठीचा अभिमान लोकांमध्ये जागृत व्हावा यासाठी उचललेले एक पाऊल आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे हा कार्यक्रम करण्याची इच्छा मधुरा वेलणकर साटम, अभिजीत साटम तसेच या कार्यक्रमाची लेखिका समीरा गुजर यांनी व्यक्त केली. कार्यक्रमात जुई भागवत, आकांक्षा गाडे, आशीष गाडे, श्रीनाथ म्हात्रे यांनी काम केले आहे.