पारा 40 अंशांवर, तीन दिवस काळजीचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱया उकाडय़ामुळे नागरिक घामाघूम होत असताना अनेक भागांत पारा अचानक 39 ते 40 अंशांवर पोहोचल्याने मुंबईची अक्षरशः भट्टी झाली. ही स्थिती उद्या 16 एप्रिल रोजीदेखील कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे पालिकेकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय पालिका आणि ‘नीरी’च्या माध्यमातून मुंबईतील ‘हॉट’स्पॉट शोधण्याची कार्यवाही सुरू आहे. पुढचे तीन दिवस पारा चढाच राहणार असल्याचे पुणे हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले.

राज्याला उष्माघाताचा तडाखा

राज्यात वाढलेल्या प्रचंड उकाडय़ामुळे अनेक जिह्यांत उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा तडाखा आणखी वाढल्याने फक्त चार दिवसांत उष्माघाताचे 36 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या दीड महिन्यात 77 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यात 373 लोकांना उष्माघाताचा त्रास झाला होता.