भाजपच्या मनात नेमके काय चाललेय; जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. देशात आणि राज्यात भाजपच्या हुकूमशाहीविरोधात अनेक पक्ष एकवटले आहे. तसेच भाजपच्या अनेक नेत्यांकडून संविधान बदलण्यासाठी पक्षाला बहुमत द्या, अशी वक्तव्ये करण्यात येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. तसेच भाजपच्या मनात नेमके काय चालले आहे, याबाबत त्यांनी मोठा दावाही केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, आतापर्यंत भाजपच्या पाच उमेदवारांनी आपल्या प्रचार करताना, ‘आम्हाला संविधान बदलण्यासाठी जास्त जागांवर विजयी करा,’ असे म्हटले आहे. म्हणजेच, यांच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत आहे. यांना 400 जागा याचसाठी हव्या आहेत की, यांना संविधान बदलायचे आहे, आम्हीही तेच म्हणत आहोत. बुरसटलेल्या विचारांचे हे मनुवादी भारताला आजही पाच हजार वर्ष मागे घेऊ जाऊ इच्छितात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती परकाला प्रभाकर यांनी आपल्या मुलाखतीत बरोबर सांगितले आहे की, “प्राचीन भारतात घेऊन जाणारा हा सत्ताधारी पक्ष आहे.” भाजपच्या प्रमुख मंत्र्यांचे पती जेव्हा अशी वाक्ये बोलतात; तेव्हा खासगीत त्यांची पत्नी त्यांना काहीतरी सांगतच असणार ना! त्यामुळे स्पष्ट होतंय की, संविधान बदलणं ही एकमेव गॅरंटी सध्या दिली जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. भाजपकडून छत्रपती उदयनराजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावरूनही आव्हाड यांनी टीका केली आहे.