शासन आपल्या दारी फक्त आम्हाला उचलायला येणार का? अनिल परब यांचा सरकारला सवाल

राज्यातील हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. विधान परिषदेमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा चालू असताना विरोधकांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यानंतर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी भाषणाची सुरुवातच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांच्या उल्लेखाने करत राज्यातील कायदा व्यवस्था ढासळल्याचा आरोप केला.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गौतमी पाटील ते जरांगे पाटील व्हाया ललित पाटील असा झाला आहे. सध्या राज्यातला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू होतोय गौतमी पाटीलपासून. जातोय मनोज जरांगे पाटलांपर्यंत.. व्हाया ललित पाटील…सध्या अशी परिस्थिती आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला तर लोकांची तुफान गर्दी होते. मारामाऱ्या, भानगडी होतात, असे अनिल परब म्हणाले. आजकाल तर दिवाळी पहाटलाही गौतमी पाटील यायला लागली आहे. काय महाराष्ट्राची संस्कृती आहे. काय दिवस आलेत. दिवाळीच्या पहाटेला सकाळी-सकाळीच कार्यक्रमात मारामारी. काय चाललंय? प्रविण दरेकर, तुम्ही किती चांगले कार्यक्रम घेतले. आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती. आम्ही रस्त्यावर उभं राहून बघितले. आता हे काय चाललंय काय? असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.

अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीकास्र सोडले. 24 तारखेची डेडलाईन जवळ येतेय. महाराष्ट्राचे वातावरण अशांत झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे मराठा आरक्षणाबाबत सविस्तर भाषण केले. पण मराठ्यांना आरक्षण कसे देणार? हे सांगितलं नाही. या सभागृहात हा प्रस्ताव आणण्याचे कारणच हे होते की किमान मुख्यमंत्री सांगतील की आमची तयारी अमुक टप्प्यापर्यंत झालीये वगैरे. सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या चुका सुधारून आपल्याला पुढे जायचंय, म्हणजे आपलं आरक्षण टिकेल असा त्यामागचा उद्देश होता. त्या बाबतीत महाराष्ट्र अशांत आहे, असे परब म्हणाले.

ललित पाटीलचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेला सुरुंग लागल्याचे अनिल परब म्हणाले. ही कायदा-सुव्यवस्था कशी भंग पावली आहे, महाराष्ट्र कसा सुरक्षित नाही या सगळ्या गोष्टी ललित पाटील प्रकरणात समोर आल्या आहेत. ड्रग्जची समस्या महाराष्ट्रात ज्वलंत झाली आहे. मुंबईत तर तर कुठल्याही हुक्का पार्लरमध्ये ड्रग्ज मिळू लागले आहेत. बिल्डिंगचे वॉचमन ड्रग्ज विकायला लागले आहेत, असा आरोपही अनिल परब यांनी केला.

गुन्हा दाखल झाला आहे, आरोपी वाँटेड आहे आणि तो एसपींबरोबर आरोग्य शिबिराचे उद्घाटन करतोय. एक आमदार गणपतीत फायरिंग करतोय. बॅलेस्टिकचा रिपोर्ट येतोय की ती त्याचीच रिवॉल्व्हर आहे. मग ज्याच्या नावावर लायसन्स आहे, त्याच्यावर काहीतरी कारवाई होणार की नाही? कुणालातरी जबाबदार धरणार की नाही? की मग हे कायदे फक्त आम्हालाच? 12.10 ला रात्री आमच्यावर गुन्हा दाखल करायचा आणि सकाळी पाच वाजता शासन आपल्या दारी आम्हाला न्यायला. शासन आपल्या दारी फक्त आम्हाला उचलायला येणार का? आजकाल आम्हाला असे वाटायला लागलंय की शासन आपल्या दारी म्हटल्यावर येणार आम्हाला उचलायला. लोकप्रतिनिधी सुसाट सुटलेत. कुणीही विचारत नाहीये, असा हल्लाबोलही परब यांनी केला.