खासदार विनायक राऊत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत मंगळवारी (दि.16 एप्रिल रोजी) सकाळी 11 वाजता वाजत-गाजत मिरवणूक काढणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

मगंळवारी 11 वाजता नाचणे रोड येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयातून वाजत-गाजत मिरवणूक निघणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात भगव्या वातावरणात ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येणार आहे. त्यानंतर खासदार विनायक राऊत आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे असून विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचे्या प्रचाराचे दोन टप्पे झाले तरी महायुतीला अजून आपला उमेदवार घोषित करता आलेला नाही. त्यामुळे येथे महाविकास आघाडीचाच विजय होणार असा विश्वास व्यक्त होत आहे. खासदार विनायक राऊत मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करत हॅटट्रिकच्या दिशेने पाऊल टाकतील. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत खासदार विनायक राऊत हे दीड लाख मताधिक्याने विजयी झाले होते. तर 2019 च्या निवडणूकीत खासदार विनायक राऊत तब्बल पावणे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. यंदा हे मताधिक्य आणखी वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.