सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती सरदार भूपिंदरसिंघ मन्हास यांचे निधन

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष तथा उद्योगपती सरदार भूपिंदरसिंघ मन्हास (74) यांचे शुक्रवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

‘हर्मन फिनोकेम लिमिटेड’चे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. जवळपास 60 हून अधिक देशांत या पंपनीचा विस्तार असून चार हजार कर्मचारी या उद्योगात कार्यरत आहेत. संभाजीनगर, शेंद्रा, मुंबई येथे तसेच देशातील वेगवेगळय़ा ठिकाणी या कंपनीची कार्यालये कार्यरत आहेत. विशेष म्हणजे कोरोनाकाळात याच पंपनीच्या वतीने नांदेड शहर आणि जिह्यात तसेच वेगवेगळय़ा गुरुद्वारा परिसरात सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले होते तसेच जिल्हा प्रशासनालादेखील अनेक ठिकाणी मोफत सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते.

नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे ते 2018 ला अध्यक्ष झाले. त्या काळात वेगवेगळय़ा शैक्षणिक सुविधा, शीख समाजासाठी विविध सोयी-सवलती, नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा परिसरात विकासात्मक कामांचा आराखडा तसेच जगाच्या नकाशावर सचखंड गुरुद्वाराचे महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात प्रयत्न केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. 1 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.