…तर गरीब मुलं हिंसक बनून देशानं साध्य केलेल्या गोष्टींचा नाश करतील! नारायण मूर्तींनी दिला इशारा

संयुक्त राष्ट्र मुख्यालयात हिंदुस्थानच्या स्थायी मिशनने आयोजित केलेल्या ‘अचिव्हमेंट्स इन फूड सिक्युरिटी: इंडियाज स्ट्राइड्स टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ या विशेष कार्यक्रमाला संबोधित करताना इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी आपला एक किस्सा सांगितला आणि महत्त्वाचा इशाराही दिला. मूर्ती यांनी सांगितलं की की 50 वर्षांपूर्वी जेव्हा ते युरोपमध्ये हिचहाइकिंग करत होते तेव्हा त्यांना 120 तास उपवास घडला होता.

‘तुमच्यापैकी बहुतेकांकडे उपाशी राहण्याचा अनुभव नसेल. माझ्याकडे आहे’, असं मूर्ती यांनी कार्यक्रमादरम्यान UN चे उच्चाधिकारी, शैक्षणिक संस्था, नागरी समाज संस्था आणि हिंदुस्थानी वंशाच्या सदस्यांना संबोधित करताना सांगितलं.

ते म्हणाले की 50 वर्षांपूर्वी, ‘मी युरोपमध्ये आणि बल्गेरिया आणि त्यावेळचे युगोस्लाव्हिया आणि आजचे सर्बिया यांच्यामधील सीमावर्ती शहर निश नावाच्या ठिकाणी सलग 120 तास उपाशी राहण्याचा अनुभव घेतला आहे.

‘मला आणि येथील बहुतेक हिंदुस्थानींना सरकारकडून उत्तम दर्जाचे आणि उच्च अनुदानित शिक्षण मिळाले आहे. म्हणून, सुसंस्कृत लोक म्हणून, आपण आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि या असहाय, गरीब मुलांच्या भावी पिढीला चांगले शिक्षण घेण्यासाठी मदत केली पाहिजे’, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टाइम्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

हे यश असहाय लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणत आहे, असं सांगून मूर्ती म्हणाले, ‘अक्षय पात्र धोरण बऱ्याच प्रमाणात यशस्वी म्हणावं लागेल. गरीब मुलांनी आपल्या समाजातील आशा आणि विश्वास गमावला तर ते हिंसाचाराकडे वळतील आणि हिंदुस्थाननं साध्य केलं आहे आणि साध्य करण्याची आशा आहे अशा सर्व चांगल्या गोष्टींचा नाश करतील’.

मूर्ती यांनी यावेळी केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या विविध धोरणांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, ‘अक्षय पात्राने अन्न स्वच्छ आणि गरम आणि धूळमुक्त असल्याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने ते खूप प्रभावित झाले आहेत’.