अखेर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री ठरले! आमदार मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही मध्य प्रदेशात मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपकडून निर्णय होत नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत भाजपने 163 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, पक्षश्रेष्ठी शिवराज मामांवर नाराज असल्याने त्यांना पुढची टर्म मिळणार नाही, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ वर्तवत होते.

भाजप आपल्या नेहमीच्याच धक्कातंत्र पद्धतीने एखादा नवीन चेहरा या पदासाठी जाहीर करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. या अपेक्षेप्रमाणेच भाजपने सोमवारी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठी घोषणा केली. उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे भाजपने जाहीर केले आहे. गटनेत्यांच्या बैठकीत यादव यांच्या नावावर एकमत झाले आहे. यादव हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या जवळचे आहेत.

मोहन यादव हे मुख्यमंत्री तर जगदीश देवड़ा आणि राजेंद्र शुक्ला हे दोघे उपमुख्यमंत्री असतील, असे भाजपने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येणार आहे.