छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी केली भाजप नेत्याची हत्या; घटनेनंतर संदेश लिहीत दिला इशारा

naxal-attack
फाईल फोटो

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील नक्षलवाद्यांविरोधातील सर्वात मोठ्या कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. नक्षलवाद्यांनी एका भाजप नेत्याची घरात घुसून हत्या केली आहे. या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईत 29 नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याने बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

ही घटना बयानार परिसरातील दंडवन गावातील आहे. मंगळवारी रात्री 11 वाजता नक्षलवाद्यांनी भाजप कार्यकर्ते आणि उपसरपंच पंचम दास मानिकपुरी उर्फ गोलू यांच्या घरी पोहोचले. यावेळी नक्षलवादी दार तोडून भाजप नेत्याच्या घरात घुसले आणि धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. हत्येनंतर नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठीही सोडली आहे.

नक्षलवाद्यांनी भाजप नेत्याच्या घराबाहेर एक फलक लावला आहे. त्या फलकावर मृत भाजप नेत्यावर भ्रष्टाचारासोबत पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप केला आहे. उपसरपंच आपले ऐकत नव्हते. म्हणून त्यांची हत्या केल्याचे नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचलेत. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेनंतर पोलीस दल, डीआरजी, आयटीबीपीचे पथक तपास करत आहेत.