क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार; महिला श्रमशक्तीसाठी मोलाचे योगदान

जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिकांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. आर्थिक विज्ञान क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला असून अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 2023 मध्ये नोबेल पुरस्कार पटकावणारी क्लॉडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. महिलांच्या श्रम बाजारातील परिणामांबाबत समज वृद्धिंगत केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. श्रम बाजारात महिलांची भूमिका समजून घेणे समाजासाठी महत्त्वाचे आहे. क्लॉडिया गोल्डिनच्या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल धन्यवाद, आम्हाला आता भविष्यात कोणते अडथळे दूर करावे लागतील याबद्दल बरेच काही समजले आहे, असे अर्थशास्त्रातील पुरस्कारासाठी समितीचे अध्यक्ष जेकोब स्वेन्सन म्हणाले.

नोकरीच्या ठिकाणी महिला आणि पुरुष यांच्या कमाईत बरीच तफावत असते. शिक्षण आणि व्यवसायावरून कमाईतील हा फरक पूर्वी दाखवून दिला जायचा. परंतु यंदा आर्थिक विज्ञान पुरस्कार विजेत्या क्लॉडिया गोल्डिन यांनीच दाखवून दिलंय की, आता एकाच व्यवसायात असलेल्या स्त्री आणि पुरुष यांच्या कमाईतही तफावत आढळते. महिलेला पहिलं मूल झाल्यानंतर ही तफावत प्रकर्षाने जाणवते. क्लॉडिया गोल्डिन या हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. त्या 1989 ते 2017 पर्यंत NBER (National Bureau of Economic Research) च्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्था विकास कार्यक्रमाच्या संचालकपदीही होत्या. तसंच, NBER च्या जेंडर इन द इकोनॉमी समूहाच्या त्या उपसंचालिकाही होत्या. क्लॉडिया गोल्डिन यांनी अर्थशास्त्रात अनेक संशोधन केलं आहे. महिला श्रम शक्ती, स्त्री-पुरुषांतील कमाईतील तफावत, नोकरीच्या ठिकाणी मिळणारे असमान उत्पन्न, शिक्षणसारख्या अनेक विषयांत त्यांनी अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे.

दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा केली जाते. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी नॉर्वेमधील ओस्लो, आणि स्वीडनच्या स्टॉकहोम या शहरांमध्ये बक्षीस वितरण सोहळे आयोजित केले जातात. औषध, भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि अर्थशास्त्रातील नोबेल विजेत्यांना पारितोषिकं वितरीत केली जातात. किंग कार्ल, राणी सिल्विया यांच्यासह जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पारितोषिकं वितरित केले जातात. तर ओस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक दिलं जातं.