मोदींचा दौरा… रंगीत तालीम फसली, पुण्यात दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडोकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी बंदोबस्ताची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामुळे शेकडो चाकरमान्यांना वाहतूककोंडीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: मध्यवर्ती भागात अचानकपणे रस्ते बंद केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. रंगीत तालीम फसल्याने डेक्कन, जंगली महाराज रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रोड, मध्यवर्ती पेठांमध्ये अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पोलिसांकडून जागोजागी बॅरिकेटिंग करून सोमवारी वाहतूक विभागाकडून अचानकपणे बदल केल्यामुळे परिसरातून जाणाऱया नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गांवर बंदोबस्ताची सोमवारी सकाळी अकरा वाजेनंतर रंगीत तालीम घेण्यात आली. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अर्धा ते एक तास उशिराने कार्यालय गाठावे लागले.

वाहतुकीचा बोजवारा; कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त

शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. प्रमुख रस्ते, उपरस्ते, चौकात सरकते लोखंडी कठडे (बॅरिकेटिंग) उभे करण्यात आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अचानक वाहतूक बंद केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय झाली. परिसरातून ये-जा करणाऱया वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक विभागाकडून ठोस उपाययोजना आणि वाहतूक नियोजन न केल्यामुळे विस्कळीतपणा निर्माण झाला होता. दुसरीकडे बंदोबस्तासाठी तैनात केलेले बहुतांश कर्मचारी, अंमलदार मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. तर काही जणांनी गप्पांचा फड रंगविला होता. त्यामुळे वाहतूककाsंडीचा प्रचंड बोजवारा उडाला होता आणि रंगीत तालीम फसली.