मोबाईल फुटला अन् एक लाख खात्यातून गेले, ओशिवरा पोलिसांनी भामटय़ाला पकडले

मोबाईल फुटला आणि त्यातले सीम कार्ड गहाळ झाल्यानंतर मोबाईल मालकाच्या बँक खात्यातून एक लाख चार हजार रुपये वळते झाल्याचा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर संबंधित तरुणाने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक झालेल्या रकमेपैकी 40 हजार 700 रुपये थांबवले. तसेच हा झोल करणाऱया रामजी कुमार प्रभू राय यादव (20) या भामटय़ाला बेडय़ा ठोकल्या.

जोगेश्वरी पश्चिमेकडील आनंद नगरात राहणारा श्रवण साहू (20) या तरुणाचा मोबाईल फुटला होता. त्यातले सीम कार्ड गहाळ झाले होते. तत्पूर्वी साहूने त्याच्या एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डद्वारे बँक बॅलन्स तपासला असता खात्यात एक लाख 13 हजार 500 रुपये इतकी रक्कम होती. मात्र मोबाईल फुटल्यानंतर श्रवणने दुसऱया दिवशी गहाळ झालेल्या क्रमांकाचे नवीन सीम कार्ड घेऊन सुरू केले. त्यानंतर कार्ड ऑक्टिव्ह झाल्यावर श्रवणला त्याच्या बँक खात्यातून एक लाख चार हजार रुपये दुसऱया खात्यात वळते झाल्याचा संदेश आला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रवणने ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विजय माडये, उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे, अशोक कोंडे, विक्रम सरनोबत या पथकाने तपास सुरू केला. फसवणूक झालेली रक्कम इंडसइन्ड बँकेतल्या खात्यात वळते झाल्याचे व मूळचा हरियाणाचा असलेला रामजी कुमार प्रभुराम यादव याचे ते खाते असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने जोगेश्वरीच्या आनंद नगर परिसरातून त्याला ताब्यात घेतले.