पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्यामध्ये सुरक्षा ताफ्यावर आत्मघाती हल्ला, 9 सैनिकांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस दहशतवाद्यांकडून आत्मघाती हल्ले वाढत आहेत. ज्या दहशतवादाला खतपाणी घातले, तेच आता पाकिस्तानच्या अंगलट आलेले आहे. अशातच पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्यामध्ये सुरक्षा ताफ्याला लक्ष्य करुन आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात नऊ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या प्रतिबंधित दहशतवादी संघटने हा आत्मघाती हल्ला केल्याची लष्कराने माहिती दिली.

पाकिस्तानी सेनेच्या मीडीया शाखा इंटर सर्विसेज पब्लिक रिलेशन यांच्या माहितीनुसार, बाईकस्वार हल्लेखोराने खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या बन्नू जिल्ह्यातील सुरक्षा ताफ्याला लक्ष्य केले. हल्लेखोराने आणलेली बाईक ताफ्यात असलेल्या वाहनांना धडकली, ज्यामध्ये नऊ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आणि त्यात 20 सैनिक जखमी झाले. याप्रकरणी प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

या हल्ल्यानंतर पोलिसांनी तातडीने स्फोटाच्या ठिकाणी धाव घेत संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन, हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. पाकिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. अशा प्रकारची कृत्ये निंदनीय असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.