नगरमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदीने गोरगरीबांची फसवणूक; भाजप युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षांचा आरोप

नगर शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक व पिळवणूक होत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ यांनी केला आहे. तर शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत करुन गोरगरीब नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब नागरिकांची पिळवणूक करत असल्याने अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे समस्या घेऊन येत आहे. यापूर्वी देखील या प्रश्‍नासंदर्भात तक्रार करुन देखील त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही. स्वस्त धान्य दुकानदार गोरगरीब नागरिकांना अरेरावीची भाषा करुन, महिलांशी उद्धट वर्तन करत आहे. नियमाप्रमाणे जेवढे धान्य देणे अपेक्षित असते, त्यापेक्षा कमी धान्य देऊन वरूनच कमी येत असल्याचे सांगितले जात आहे. कित्येक लाभार्थींकडून ऑनलाईनच्या नावाखाली अर्ज कागदपत्र स्वीकारून अन्न-धान्य वितरण कार्यालयात सादर न केल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक ठिकाणी दुकानाचा परवाना एका व्यक्तीचा व दुकान दुसरा व्यक्ती चालवत असल्याचा आरोप बोचुघोळ यांनी केला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरिबांसाठी मोफत अन्नधान्य योजनेचा बोजवारा उडत आहे. शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानामध्ये अफरातफरी होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. ग्राहकांना धान्य कमी देणे, धान्य काळ्या बाजारात विकणे, दिवाळीच्या काळामध्ये आनंदाचा शिधातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आलेले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरातील वितरण व्यवस्था सुरळीत करुन गोरगरीब नागरिकांना रेशनचे अन्न-धान्य मिळावे, अफरातफर करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी बोचुघोळ यांनी केली आहे.

शहरात गोरगरीबांना रेशनवरील स्वस्त अन्नधान्य मिळण्यास अनेक अडचणी येत आहे. दुकानदारांच्या अनागोंदी कारभाराचा फटका लाभार्थींना बसत असल्याने दुकानदारांच्या विरोधात नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारी करत आहे. मात्र अन्नधान्य पुरवठा अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रयत्नशील असून, सर्वसामान्य नागरिकांना रेशन संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
-मयुर बोचुघोळ, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा