नंदुरबारमार्गे जपानला जाण्याचा नवा मार्ग, ग्रामस्थ झाले चकीत

हिंदुस्थानातून जपानला जायचं असेल तर विमानाने जावं लागतं. तिथे जाण्यासाठी थेट रस्ता जात नसल्याचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता महाराष्ट्रातील नंदुरबारमधून जपानला आपल्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दिशादर्शक फलक लावला असून त्यावर जपानचेही नाव झळकले आहेत. बोर्डावर जपानचे नाव पाहून नंदुरबारवासी आश्चर्यचकीत झाले आहेत.

बोर्डावर जपानचं नाव झळकलेलं पाहून स्थानिकांनी जपानला जायचं ठरवलं. मात्र ते जमाना नावाच्या गावात पोहोचले आणि मग सगळा गोंधळ उजेडात आला. ग्रामस्थांना माहिती होतं की आपल्या परिसरात जपान नावाचं एकही गाव नाहीये. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची चूक असल्याचं त्यांना दाखवून द्यायचं होतं. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘जमाना’ नावाच्या गावाचं स्वत:च बारसं करून ते जपान केलं आणि ते बोर्डावर छापूनही टाकलं असा आरोप केला जात आहे. हे नाव जेव्हा ग्रामस्थांनी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की हा रस्ता थेट विदेशात जात असावा, मात्र थोडी शोधाशोध केल्यानंतर काय प्रकार घडलाय हे ग्रामस्थांच्या लक्षात आले. एका तरुण ग्रामस्थाने म्हटले की गावातील काही टारगट तरणांनी ‘जमाना’ या नावातील काही भागवर हिरव्या रंगाने रंगवून टाकत हे नाव ‘जपान’ केले

अवांतर- जपानमधील समाजजीवनाविषयीची संक्षेपात माहिती

जपानचे आदिवासी ऐनू नावाचे लोक साधारणपणे १५,००० असून ते होक्काइडो बेटावर राहतात. चीनमधून व आग्नेय आशियातून काही लोक जपानी बेटांवर अगदी सुरुवातीला राहण्यास गेले असावेत, असा एक समज आहे. त्यानंतरच्या बऱ्याच वर्षांच्या ऐतिहासिक काळात हे सर्व लोक एकमेकांत मिसळून एकरूप झाले.

एडो राजवटीत (१६०३–१८६७) सरदार व इतर दरबारी मानकरी मंडळी सोडल्यास जपानी समाजाचे मुख्य चार वर्ग होते : योद्धे (सामुराई), शेतकरी, कारागीर व व्यापारी. हे वर्ग पिढीजात असत व व्यक्तीला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाण्यास बंदी होती. मेजी राजवटीच्या सुरुवातीला (१८६८–१९१२) ही कडक वर्गव्यवस्था मोडण्यात आली आणि वर्गमुक्त समाजाचे तत्त्व स्वीकारण्यात आले. या काळात बहुसंख्य लोक शेतकरीच होते. १८९० नंतरच्या काळात मात्र औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. त्याबरोबरच कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांचा वर्ग जोरात वाढू लागला, तसाच पांढरपेशा वर्गही वाढला. आधुनिक जपानी समाजाची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल : (१) मोठे उद्योगपती आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी हे लोक वरच्या वर्गात मोडतात. ते साधारणतः २ टक्के आहेत. (२) लहान प्रमाणावर उद्योगधंदे करणारे व पांढरपेशे हे मध्यमवर्गीयांत मोडतात. ते साधारणपणे ३८ टक्के आहेत. (३) उरलेला खालचा वर्ग मुख्यतः कामगार लोकांचा आहे. त्यांत ६० टक्के लोकांचा समावेश होतो. या सर्व वर्गांपैकी मध्यमवर्गीय, विशेषतः पांढरपेशा वर्ग वाढतच चालला आहे.

दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, त्या सुमारास सर्व दरबारी हुद्दे रद्द करण्यात आले. परिणामतः जुनी राजघराणी व सरदारघराणी नष्ट झाली. कायद्याच्या दृष्टीने सम्राट व त्याचे कुटुंबीय एवढेच राजघराण्याचे सदस्य मानले जातात.
जपानमध्ये सामाजिक स्थित्यंतर मुख्यतः शिक्षणावरच अवलंबून आहे. जपानी लोकांना शिक्षणाविषयी जात्याच फार आदर आहे. त्यामुळे शाळकरी मुलेमुली उच्च शिक्षण घेण्यास फार उत्सुक असतात. सुरुवातीचे १४ वर्षांचे सक्तीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ ७० टक्के विद्यार्थी उच्च शालेय शिक्षणासाठी जातात आणि उच्च शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांतील सु. २० टक्के विद्यार्थी महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेतात. जपानमध्ये सु. २९१ विद्यापीठे आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळे जपानमधील साक्षरतेचे प्रमाण सु. ९८ टक्के आहे.

कुटुंबातील सर्वांत वडीलमुलाकडे वारसाहक्क असण्याची पद्धत जपानमध्ये पुरातन काळापासून चालत आलेली आहे. विवाहानंतरसुद्धा वडीलमुलाने आपल्या आईवडिलांजवळ राहून कुटुंबाची जबाबदारी उचलावी असा दंडक असल्याने साहजिकच त्याला कुटुंबप्रमुखाच्या खालोखाल मानाचे स्थान मिळत असे. कुटुंबातील इतर मुलांना व विशेषतः मुलींना फारच कमी प्रतीचे स्थान असे. त्यांनी सदैव वडिलांच्या अगर थोरल्या भावाच्या आज्ञेत रहावे, असा दंडक असे. विवाह वडीलधारी मंडळी ठरवीत व प्रेमविवाहाला मान्यता मिळणे जवळजवळ अशक्यच असे. या सर्व चालीरीती दुसऱ्या महायुद्धापर्यंत चालू होत्या परंतु त्यानंतर मात्र नागरी कायद्यात बदल झाल्याने कौटुंबिक पद्धतीत व समाजरचनेत पुष्कळसे बदल झाले. याचा परिणाम म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती मोडकळीला आली. पतिपत्नी आणि त्यांची मुले अशी कुटुंबपद्धती अस्तित्त्वात आली. तसेच स्त्रीशिक्षणाचा प्रसार झाल्याने शिक्षित स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करू लागल्या. याशिवाय औद्योगिकीकरण वाढत चालल्याने समाजात विभक्त कुटुंबपद्धतीचा पुरस्कार होऊ लागला. हे एक प्रकारचे मोठेच सामाजिक परिवर्तन म्हणावे लागेल. मात्र ते प्रामुख्याने शहरांतूनच दिसून आले.

नव्या नागरी कायद्यान्वये कुटुंबाची मालमत्ता सर्व मुलांत सारखी वाटली जाते. तसेच आईवडिलांची जबाबदारी फक्त मोठ्या मुलावरच न पडता ती सर्व मुलांत सारखी विभागली जाते. हा नियम शेतकरी कुटुंबांना मात्र लागू नाही कारण शेतजमिनीची सर्व मुलांत सारखी वाटणी करून दिली, तर शेते इतकी लहान होतील की शेती करणे कठीण होऊन बसेल. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात मात्र बरीचशी शेतकरी कुटुंबे कुटुंबातील एका मुलाची निवड करून त्याला सर्व शेते देऊन शेतीवाडीची आणि आईवडिलांची जबाबदारी त्याच्यावर सोपवितात. त्यामुळे वरकरणी तरी अशा कुटुंबांत जुनी एकत्र कुटुंबपद्धतीच आढळते. परंतु कायद्यान्वये मात्र सर्व मुलांचा मालमत्तेवर समान हक्क असल्याने सर्व मुलांचे कुटुंबातील स्थान पूर्वीपेक्षा अधिक समान झाले आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर विवाहपद्धतींतही बराच बदल झाला. वडीलधाऱ्यानी ठरविलेले विवाह अजूनही रूढ आहेतच परंतु प्रेमविवाहांचे प्रमाण वाढले आहे. हा बदल घडून येण्यास बऱ्याच गोष्टी कारणीभूत झाल्या आहेत : समाजातील स्त्रियांचे सुधारलेले स्थान, मुलामुलींना शाळेत किंवा इतर संस्थांमध्ये एकमेकांत मिसळावयाची वाढती संधी आणि नवीन छोटी कुटुंबपद्धती यांसारखी अनेक कारणे नमूद करता येतील. दुसऱ्या महायुद्धापूर्वी समाजाला स्त्रीपुरुषांनी एकत्र फिरणे, अगदी पतिपत्नी असले तरीसुद्धा मान्य नव्हते परंतु आता समाजाचा दृष्टिकोन बदलला आहे. पतिपत्नी सहजीवी आहेत व म्हणूनच सहजीवनाच्या कल्पनेला आता प्राधान्य दिले जाते.

जपानी समाजात धर्म हा मुख्यत्वेकरून सामाजिक चालीरीतींवरच आधारलेला आहे, अध्यात्मावर नव्हे. सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्ती शिंतो-मंदिर व बुद्धमंदिर अशा दोन्हीही देवळांत दर्शनार्थ जाते. शिंतो आणि बौद्ध हे दोन धर्म जपानमध्ये प्रभावी आहेत. मात्र जपानी लोकांचे धर्मविचार सांस्कृतिक वा तत्त्वज्ञानात्मक विचारसरणीवर आधारलेले नाहीत. लोक केवळ मनावरील पूर्वापार संस्कारांमुळेच शिंतो देवळात जाऊन चांगले पीक यावे, मासे पकडण्याचा धंदा अगर इतर कामे चांगली व्हावीत, कुटुंबात किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यांत चांगल्या गोष्टी घडाव्यात, म्हणून प्रार्थना करतात. त्याच कारणाने जपानी लोक अंत्यविधीसाठी वा मृतांच्या आत्म्यासाठी करावयाचे संस्कार बुद्धमंदिरात जाऊन करतात. दोन वेगळ्या गोष्टींसाठी दोन वेगळ्या धर्मांचा उपयोग करण्यात जपानी लोकांना काहीच वावगे वाटत नाही. शिंतोधर्मीय देवालये प्रत्येक शहरात आणि खेड्यापाड्यांतही आहेत. वसंत, ग्रीष्म अथवा शरद ऋतूंमध्ये प्रत्येक देवालयाचा उत्सव असतो. देवळाजवळील प्रदेशात सुगीचे दिवस आले की, त्या देवळात उत्सव होतो. जपानमध्ये सु. ७९,००० शिंतो-मंदिरे आहेत व सु. ७५,००० बुद्धधर्मीय मंदिरे आहेत. बौद्ध धर्मामुळे जपानी समाज, संस्कृती व तत्त्वज्ञान यांमध्ये विपुल भर पडली आहे परंतु अंत्यविधीपुरताच उरलेला बौद्ध धर्म तग धरून राहिला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. मोठ्या शहरांतील लोक बौद्धधर्मीय अगर शिंतोधर्मीय मंदिरांशी फारसा संबंध ठेवत नाहीत.

ख्रिस्ती धर्म जपानमध्ये ४०० वर्षांहूनही जास्त काळ प्रचलित आहे परंतु त्याचा प्रसार फारसा जोरात झाला नाही. सर्व देशांत फक्त ९०० कॅथलिक व २,९०० प्रॉटेस्टंट चर्चे असून ख्रिस्तधर्मीय लोक सु. ६५,००० आहेत. ख्रिस्ती धर्म व जपानी संस्कृती यांत मूलभूत भिन्नता असल्याने जपानमध्ये काही मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोक सोडल्यास इतरांच्यात या धर्माचा प्रसार होऊ शकला नाही. जपानमध्ये शिंतो, बौद्ध आणि ख्रिस्ती या प्रमुख धर्मांतूनच काही नवीन पंथ उदयास आल्याचे दिसते. मेजी राजवटीत शिंतो धर्माचा तेन्री-क्यो नावाचा एक नवा पंथ स्थापन झाला. युद्धपूर्व श्योवा राजवटीत बौद्ध धर्माचा ऱ्यू-काई हा पंथ प्रचलित होता. दुसऱ्या महायुद्धानंतर रिश्योकोसेई-काई व सोका-गाक्काई असे दोन नवे पंथ निर्माण झाले. या नव्या पंथात समाजातील खालच्या थरांतील श्रमजीवी लोक जास्त प्रमाणावर आढळतात. सोका-गाक्काई या पंथाला बरेच अनुयायी मिळाल्यामुळे या पंथाने राजकारणातही शिरकाव केला व कोमेई हा राजकीय पक्ष स्थापन केला. जपानी लोकांचे मुख्य अन्न म्हणजे भात परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र अमेरिकेच्या प्रभावामुळे त्यांच्या जेवणामध्ये पावाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला. मांस व दूधदुभत्याचे प्रकारही त्यांच्या जेवणात असतात. सोयाबीनच्या पदार्थांचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर होतो.

जपानी स्त्रीपुरुषांत पाश्चिमात्य पोषाखच रूढ आहे. पुरुष घरात किमोनो किंवा युकाता वापरतात. स्त्रिया विवाहप्रसंगी भरजरी किमोनो वापरतात. जपानी स्त्रीवर्गात दागिने फारसे प्रचलित नाहीत.जपानी घरे मुख्यतः लाकडाचीच बांधलेली असतात. घराच्या आतील दालनांचे विभाजन लाकडाच्या चौकटीवर कागद चिकटवलेल्या सरकत्या पडद्यांनी केलेले असते. यामुळे खोल्या जरूरीप्रमाणे लहानमोठ्या करता येतात. घरात सर्वत्र एक ते दीड इंच जाडीच्या गवताच्या चटया पसरलेल्या असतात. त्या चटयांना तातामी म्हणतात. बैठकीसाठी मोठ्या उशांचा वापर करण्यात येतो. तथापि टेबल, खुर्च्या, मेजे यांचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे.

जागेच्या टंचाईमुळे अलीकडे काँक्रीटचे निवासी गाळे असलेल्या वसाहती बऱ्याच झाल्या आहेत. त्यांत पारंपरिक व पाश्चिमात्य अशा दोन्ही पद्धतींच्या गृहरचनांचा समन्वय साधलेला दिसून येतो. मोठ्या शहरांतून सु. ९२ टक्के लोकांकडे दूरचित्रवाणी संच आहेत, सु. ७२ टक्के लोकांकडे विजेची धुलाई यंत्रे आहेत, सु. ५४ टक्के लोकांकडे शीतकपाटे आणि सु. ८० टक्के लोकांकडे शिवणयंत्रे आहेत.

माहिती संदर्भ- https://vishwakosh.marathi.gov.in/18944/