आम्ही पावसाळय़ातल्या छत्र्या आहोत की नाही ते योग्यवेळी बोलू! राजेंद्र पवार यांचा अजितदादांना टोला

पावसाळ्यातल्या छत्र्यांसाठी आपल्या ग्रामीण भागात वेगळा शब्द वापरला जातो. तो मी वापरत नाही. पण आम्ही पावसाळ्यातल्या छत्र्या आहोत की नाही, याबद्दल योग्य वेळी सविस्तर बोलू, असा टोला अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. त्यांच्या प्रचारात यापूर्वी फिरलो की नाही, हे बारामतीकरांना चांगले माहीत आहे, त्यांना आता सोयीस्कर विसर पडला त्याला कोण काय करणार, असेही ते म्हणाले.

सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात 19 एप्रिलला  कन्हेरी येथून होणार आहे. त्यासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जवाहर वाघोलीकर, सदाशिव सातव, अॅड. संदीप गुजर, एस.एन. जगताप, सत्यव्रत काळे, अॅड. अशोक इंगुले, प्रियांका शेंडकर, सुभाष ढोले, वीरधवल गाडे आदी उपस्थित होते.

राजेंद्र पवार म्हणाले, आमच्या कुटुंबात काही जबाबदाऱया यापूर्वीच निश्चित झाल्या. मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो. अजित पवार हे राजकीय क्षेत्रात होते. बारामतीचा विकास मीच केला असे कसे? त्यात खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार आदींचा निधी होता. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकाच ठिकाणी स्वयंपाक होत होता. पण वाढपी मात्र त्यांचा होता. वाढप्याने वाढण्याचे काम केले म्हणजे स्वयंपाक त्याचा एकटय़ाचाच होता, असे होत नाही, असे राजेंद्र पवार म्हणाले.

माझ्या प्रचारात भावंडे कधी फिरली नाहीत, आता गरागरा फिरत आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्याचाही समाचार राजेंद्र पवार यांनी घेतला. त्यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीला आम्ही सायकलवरून प्रचार केला आहे. त्यानंतरही केला आहे. पण त्यांना आता सोयीस्कर विसर पडला आहे.