भांडुप जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती; मुंबईत 24 एप्रिलपर्यंत 5 टक्के पाणीकपात

पालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईत 24 एप्रिलपर्यंत 5 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि आवश्यक पाण्याच्या साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पालिकेचे भांडुप जलशुद्धीकरण पेंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे 1 हजार 910 दशलक्ष लिटर आणि 900 दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट आहेत. यापैकी 900 दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन 990 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या 900 दशलक्ष लिटर क्षमतेच्या या जलशुद्धीकरण केंद्रातील मोठय़ा जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वीची परिरक्षण कार्यवाही सध्या हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठय़ात 5 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.