सामना अग्रलेख – गडकरींचे काय होणार?

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले. नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे काय?

भारतीय जनता पक्षाने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. (कालच त्यांनी देशातील शेतकरी व मजूर दुःखी आहेत असे सांगितले.) कुणाच्या पुढे ‘हांजी हांजी’ करणारे नाहीत. देशात गेल्या दहा वर्षांत जो विकास झाला असे मानायचे, त्या विकासात सर्वाधिक योगदान गडकरी सांभाळत असलेल्या रस्ते निर्माण मंत्रालयाचे आहे. गडकरींनी निर्माण केलेल्या अनेक राष्ट्रीय प्रकल्पांची उद्घाटने पंतप्रधान मोदी यांनी केली, पण त्या कार्याचे श्रेय त्यांनी गडकरींना दिले नाही. मंत्रिमंडळात व भाजपमध्ये मोदी-शहांच्या टगेगिरीपुढे न झुकणारा एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी. गडकरी यांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे स्वाभिमान, अभिमानाचा ताठ कणा या मराठी नेत्याला लाभला आहे. अशा गडकरींचे आव्हान म्हणा की भीती, ही मोदी-शहांच्या व्यापार मंडळास वाटणारच. त्याच भीतीमुळे 2024 च्या निवडणुकीतून नितीन गडकरींना डावलायचे असे ठरवलेले दिसते. गडकरी यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही याचे दुःख पक्षातील त्यांच्या चाहत्यांना नक्कीच झाले असेल. विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय महासचिव आहेत. त्यांनी 195 नावे जाहीर केली. त्यात गडकरींचा समावेश नाही. गडकरींचे नाव पहिल्या यादीत का नाही? हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत विषय आहे; पण 195 नावे जाहीर करताना तावडे यांच्या मनासही ती खंत जाणवली असेलच. ज्या विनोद तावडेंना 2019 साली मोदी-शहांनी उमेदवारी नाकारली, त्याच तावडे यांनी ‘गडकरी’ वजा 195 उमेदवारांची यादी जाहीर केली. 2024 साली पक्षात कोणाचेही आव्हान असू नये व गडकरी हे आव्हान ठरू शकतात. मोदी यांनी ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला. हे खरे नाही, ही सर्व हवाबाजी आहे. भाजपचा खेळ 230-235 वर आटोपला तर भाजपमध्येच बंड होईल आणि

मोदी-शहांना वगळता

भाजपचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न झाला तर नितीन गडकरी यांच्या नावास सर्वमान्यता मिळेल, या एकाच भीतीने गडकरी यांचा पत्ता आताच कट करण्याचा डाव दिसतो आहे. राजनाथ सिंह हे तसे बिनकण्याचे नेते आहेत. ते पक्षात व बाहेर कोणतेच आव्हान उभे करू शकत नाहीत. दिल्लीतील पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंचावरचे ‘हार’नाटय़ देशाने पाहिले. एक मोठा हार पंतप्रधान मोदी यांच्यासाठी मंचावर आणला होता. मोदींच्या गळय़ात तो हार घातला जात असताना त्या हारात राजनाथ सिंह यांनी डोके घालताच अमित शहांनी डोळे वटारले व राजनाथ सिंहांनी हारातून डोके काढून घेतले. राजनाथ यांच्या शेजारीच मंचावर नितीन गडकरीही उपस्थित होते. हाराच्या या नौटंकीत ते अजिबात सामील झाले नाहीत व स्वाभिमानी मराठी माणसासारखे त्यांनी वर्तन केले. असा ताठ कण्याचा, स्वाभिमानी मराठी माणूस सध्याच्या दिल्लीतील व्यापार मंडळास कसा परवडेल? 2024 च्या निवडणुकीनंतरचे दिल्लीतील राजकीय चित्र अस्थिर असेल व त्या अस्थिरतेच्या काळात सर्वच पक्षांना मान्य ठरतील असे गडकरी दिल्लीत नकोत हा साधा हिशेब दिसतो. गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळू नये म्हणून तेव्हा भाजपमध्ये गलिच्छ राजकारण झाले. गडकरींशीसंबंधित कंपन्यांवर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकण्यात आल्या. गडकरींना पुरते बदनाम केले गेले व त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून रोखण्यात आले. यामागे भाजपचे सध्याचे व्यापारी मंडळ होते. गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष झाले असते तर राष्ट्रीय राजकारणात मोदी-शहांचा उदय झाला नसता. गडकरींच्या जागी राजनाथ सिंह भाजपचे अध्यक्ष झाले व त्यांनी मोदी हे पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असे जाहीर केले. 2014 साली देशात ही दुर्घटना घडली. त्याचे परिणाम देश भोगत आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान… सर्व काही धोक्यात आले आहे व निवडणुका जिंकण्यासाठी स्वैराचार सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पठडीत निर्माण झालेले गडकरी तरीही आपली मते परखडपणे मांडत आहेत. गडकरींचा अपमान करण्याची एकही संधी गेल्या दहा वर्षांत

व्यापार मंडळाने

सोडली नाही. आता तर कहर झाला. भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. प. बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून वादग्रस्त पवन सिंह या भोजपुरी नटाचे नाव जाहीर झाले. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले. गडकरी यांना त्यांची जागा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. व्यापारी मंडळाचे ऐकणार नसाल, त्यांची जी हुजुरी करणार नसाल तर त्याची शिक्षा मिळेल, हाच संदेश स्पष्ट आहे. गडकरी यांना उमेदवारी नाकारली तर नागपुरातून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवार बनवले जाईल व फडणवीसही मोठ्या हौसेने नागपुरातील नवरदेव म्हणून घोड्यावर बसतील. फडणवीस हे 2014 साली मुख्यमंत्री झाले त्या वेळी ते कोणीच नव्हते. एकनाथ खडसे किंवा नितीन गडकरी यांच्यापैकीच कुणीतरी मुख्यमंत्री व्हायला हवे होते. भाजप आमदार गडकरी यांना नेता मानत होते. गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते तर आज भाजपचा जो असंस्कृत चिखल झाला आहे, जे सूडाचे राजकारण चालले आहे, तो प्रकार काही प्रमाणात थांबवता आला असता, पण मध्य प्रदेशात मोहनलाल यादव, राजस्थानात कुणालाही माहीत नसलेले भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. त्याप्रमाणेच 2014 साली महाराष्ट्रात फडणवीस यांची नेमणूक मुख्यमंत्रीपदी झाली. तेव्हापासून राज्याच्या संस्कृती व संस्कारांची गाडी उतारास लागली ती थांबलेली नाही. फडणवीस यांचा खांदा वापरून गडकरी यांच्यावर हल्ले सुरू आहेत व महाराष्ट्रातील नेत्यांना आपापसात झुंजवण्याचा खेळ दिल्लीने सुरूच ठेवला आहे. नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे काय?