सामना अग्रलेख – वापरा आणि फेका!

हरयाणातील ताज्या राजकीय घडामोडींचा सारांश काय? तर भाजप आपल्या मित्रपक्षांना गरजेनुसार वापरून घेतो व फेकून देतो. हरयाणामध्ये चार वर्षांपूर्वी दुष्यंत चौटाला यांचा पाठिंबा घेताना त्यांच्याशी प्रेमाच्या गळाभेटी केल्या. महाराष्ट्रातील भाजपचे दोन नवे मित्र हे दुष्यंत चौटालांप्रमाणेच हताश आणि वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहे. ‘वापरा आणि फेका’ हा अनुभव भाजपचा प्रत्येक मित्रपक्ष घेत आला आहे. त्या फुफाट्यातून शिवसेनाही तावूनसुलाखून बाहेर पडली व आज स्वाभिमानाने पुन्हा उभी राहिली आहे. चौटाला यांच्या ‘जननायक पक्षा’ला भाजपने कडीपत्त्यासारखे बाहेर काढले. महाराष्ट्रातील कडीपत्त्यावर लवकरच ही वेळ येणार आहे. जनता त्या दिवसाची वाट पाहात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधी हरयाणातील भाजप सरकार अस्थिर झाले आहे. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नायब सैनी हे हरयाणाचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले असले तरी सरकार चालविताना त्यांना बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. भाजपचे हरयाणातील सरकार हे दुष्यंत चौटाला यांच्या टेकूवर उभे होते. चौटाला यांच्या ‘जननायक पक्षा’चे 10 आमदार खट्टर सरकारचे समर्थन करीत होते. भाजपला येथे आवश्यक ते बहुमत नव्हते. त्यामुळे दुष्यंत यांना उपमुख्यमंत्री पद व महत्त्वाची खाती देऊन भाजपने सरकार बनवले. चौटाला यांनी पाठिंब्याची पुरेपूर किंमत या काळात वसूल केली व राज्यात भ्रष्टाचाराला मुक्त रान दिले. हरयाणात न ‘खाऊंगा न खाने दुंगा’ या घोषणेच्या नेमके उलट घडत राहिले व चौटाला यांचे ओझे खट्टर यांना इतके जड झाले की, सहन होत नाही आणि सांगताही येईना अशा समाधी अवस्थेला ते पोहोचले. चौटाला यांनी विधानसभेच्या दहा जागा जिंकल्या व त्यांचे भाग्य फळफळले. कारण भाजपला विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले नाही. भाजपने चौटाला यांना बरोबर घेतले व या कुटुंबावरील आधीचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप वॉशिंग मशीनमध्ये घालून धुवून काढले. दुष्यंत चौटाला यांचा पक्ष फोडण्याचा खेळ मधल्या काळात झालाच, पण आता लोकसभा निवडणुकीत चौटाला यांच्या ‘जजपा’ला एकही जागा देता येणार नाही ही भूमिका भाजपने घेतल्याने ‘जजपा’ सरकारमधून बाहेर पडली व खट्टर यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ‘जजपा’मुळे हरयाणातील भाजप सरकार तूर्त धडपडले. बुधवारी या सरकारने बहुमत सिद्ध केले खरे, परंतु त्यासाठी भाजपने ‘किंमत’ चुकवली हे उघड आहे. अपक्षांचा पाठिंबा त्यांना मोठा भाव देऊन मिळवावा लागला असेल. ‘खोकेबाजी’च्या माध्यमातून

सरकारे पाडणे

आणि तेथे भाजपची सत्ता स्थापन करणे यात भाजप अनुभवी असल्याने आता हरयाणात भाजपचेच सरकार राहील. फक्त सरकार वाचविण्यासाठी किती कोटींचा खेळ झाला आणि पुढेही होतो, तेच आता पाहायचे. पुन्हा खट्टर गेले व नायब सैनी आले तरी हरयाणातील शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनात फरक पडणार नाही. तसेच भाजपची तेथे उताराला लागलेली गाडी थांबणार नाही. हरयाणातील भाजपच्या दोन विद्यमान खासदारांनी अलीकडेच राजीनामा देऊन काँग्रेसची वाट धरली. हे संकेत काय सांगतात? देशभरात सर्व भ्रष्टाचारी व गुन्हेगार भाजपमध्ये प्रवेश करीत असताना हरयाणात गंगा उलटी वाहत आहे. तेथे भाजपचे खासदार फुटले व मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर संक्रांत आली. ईडी वगैरेंच्या धमक्यांना भीक न घालता हे सर्व घडले. भाजप इतर राज्यांत जे करते व घडवून आणते तेच हरयाणात त्यांच्या बाबतीत घडले आहे. बिहारात भाजपने नितीश कुमारांना फोडून आपले राज्य आणले. महाराष्ट्रातही तेच फोडाफोडीचे राजकारण केले. आता हरयाणात बहुमताची चोरीमारी करून नवे मुख्यमंत्री विजयी घोषित केले गेले. अर्थात हरयाणामध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका लावल्या जातील, ही शक्यता जास्त आहे. काही घडले तरी हरयाणातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी सोप्या राहिलेल्या नाहीत. आप व काँग्रेसची युती झालीच आहे. त्यामुळे हरयाणात किमान आठ लोकसभा जागांवर ‘इंडिया आघाडी’चे लोक जिंकतील आणि विधानसभेत भाजप जिंकणार नाही व काँग्रेसला बहुमत मिळेल असे आजचे चित्र आहे. लोकांनी ठरवले आहे व त्यानुसार भाजपची वाट लावली जाईल. जाट समुदाय हरयाणात मोठय़ा प्रमाणात आहे. भाजपने आपल्या स्वार्थासाठी जाट विरुद्ध इतर असे भांडण लावले. महाराष्ट्रात मराठे विरुद्ध ओबीसी हा झगडा त्याच पद्धतीने लावला आहे.

हरयाणातील शेतकरी

भाजपविरोधात उभा ठाकला आहे. पंजाबातील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर बंदुकांच्या बळावर रोखले आहे. पण कधीही उद्रेक होऊ शकेल. खट्टर यांचा कार्यकाळ हा अकार्यक्षम ठरला. खट्टर हे हरयाणाचे पहिले बिगर जाट मुख्यमंत्री ठरले. ते संघाचे प्रचारक होते व त्याच गुणवत्तेवर त्यांना मुख्यमंत्री केले गेले होते, पण राजकीय संकटात ते लटपटले व त्यांना जावे लागले. हरयाणातील ताज्या राजकीय घडामोडींचा सारांश काय? तर भाजप आपल्या मित्रपक्षांना गरजेनुसार वापरून घेतो व फेकून देतो. हरयाणामध्ये चार वर्षांपूर्वी दुष्यंत चौटाला यांचा पाठिंबा घेताना त्यांच्याशी प्रेमाच्या गळाभेटी केल्या. ये दोस्ती अमर है, असे सांगितले गेले. हरयाणात आता क्रांतीच घडेल असे वातावरण चार वर्षांपूर्वी केले, पण चार वर्षांत चौटाला यांचा पक्ष कमजोर करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. दुष्यंत यांना लोकसभेची एकही जागा मिळणार नाही हे आता ठणकावले. त्यामुळे जननायक पक्षाची अवस्था ही ‘ना घर का ना घाट का’ अशीच झाली. महाराष्ट्रातील भाजपचे दोन नवे मित्र हे दुष्यंत चौटालांप्रमाणेच हताश आणि वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत आहे. नकली शिवसेनेचे चंगू व भंपक राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगू यांना लोकसभा निवडणुकीत हव्या तशा जागा मिळणार नाहीत. दिल्लीतील गुजराती भाईंनी फेकलेल्या ढोकळा-फाफड्याच्या तुकड्यांवरच त्यांना समाधान मानावे लागेल. हे घडेल तेव्हा ‘आम्हीच खरे’ हा त्यांचा तोरा उतरलेला असेल. चंगू-मंगूची अवस्था ही जुन्या काळातील नगरवधूसारखी झाली आहे. भाजपने कुंकू लावले, स्वतःचे मंगळसूत्र बांधले, पण लोकांत त्यांना प्रतिष्ठा नाही हेच सत्य आहे. ‘वापरा आणि फेका’ हा अनुभव भाजपचा प्रत्येक मित्रपक्ष घेत आला आहे. त्या फुफाट्यातून शिवसेनाही तावूनसुलाखून बाहेर पडली व आज स्वाभिमानाने पुन्हा उभी राहिली आहे. चौटाला यांच्या ‘जननायक पक्षा’ला भाजपने कडीपत्त्यासारखे बाहेर काढले. महाराष्ट्रातील कडीपत्त्यावर लवकरच ही वेळ येणार आहे. जनता त्या दिवसाची वाट पाहात आहे.