सामना अग्रलेख – नीलकंठ मोदी!

मोदी व त्यांचा पक्ष रशियाच्या पुतीनप्रमाणे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणुका जिंकतो. निवडणूक आयोगास त्या पापात भागीदार केले जाते. मोदी यांनी याबाबतीत भारताचा पाकिस्तान केला आहे व ते श्रीरामाच्या आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात तेव्हा लोकांना हसू आवरत नाही. मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा ही भ्रष्टाचाराच्याच समृद्ध मार्गावरून निघाली आहे. मोदी यांचे बोलणे लोक आता गांभीर्याने घेत नाहीत. त्यांचा नीलकंठ झाला आहे. इतर पक्षांतील भ्रष्ट नेत्यांचे विष ते रोज प्राशन करतात व विरोधकांच्या नावाने तांडव करतात. अंधभक्तही भांग पिऊनच टाळ्या वाजवतात. काय करायचे?

पंतप्रधान मोदी यांचे हसरे फोटो क्वचितच दिसतात, पण त्यांच्या अचाट वक्तव्यांमुळे करमणूक होते व लोक खळखळून हसतात. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. पक्ष कार्यकर्त्यांसमोर मोदी यांनी दोन मुद्दे मांडले. भ्रष्टाचारमुक्त विकासाची यशोगाथा सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा हा पहिला मुद्दा. विरोधक चिखलफेकीचे राजकारण करतील. मात्र भाजपने विकासाचेच राजकारण करावे असा दुसरा मुद्दा मोदी यांनी मांडला. त्यामुळे देशात अनेकांना हसू फुटले. भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा हे मोदी सरकारचे सगळय़ात मोठे थोतांड आहे व गेल्या दहा वर्षांत मोदी व त्यांच्या लोकांनी जितके चिखलफेकीचे राजकारण केले, तसे इंग्रज काळातही झाले नसेल. मोदी पावलापावलांवर खोटे बोलतात व त्या खोटेपणातच स्वतःला गुंतवून ठेवतात. रामाचे मंदिर अयोध्येत उभे राहिले. मोदी यांनी मंदिरात श्रीरामाची राजकीय प्राणप्रतिष्ठा केली, पण रामाचे सत्य वचन काही मोदींच्या अंगात भिनले नाही. मोदी यांच्या सत्तेचा पाया भ्रष्टाचाराच्या टेकूवरच उभा आहे व त्याचा मुखवटा रोज गळून पडतोय. ‘निवडणूक रोखे’ म्हणजे इलेक्टोरल बॉण्डस्मधील भाजपचा भ्रष्टाचार काल सुप्रीम कोर्टानेच उघड केला. उद्योगपती, काळा बाजारवाले, परदेशी कंपन्यांना कंत्राटे देण्याच्या बदल्यात भाजपच्या तिजोरीत सात हजार कोटी रुपये जमा केले व त्याच काळ्या पैशांवर भाजपला सत्तेची सूज आली. तरीही श्रीमान मोदी भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा लोकांपर्यंत पोहोचविण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे. भाजपच्या तिजोरीत सात हजार कोटींचे ‘दान’ देणारे हे नवे कर्ण कोण? याचा खुलासा झाल्याशिवाय मोदी यांनी सार्वजनिक जीवनात वावरू नये. अमेरिका, युरोपमधील एखाद्या राष्ट्रात तेथील पंतप्रधानांनी असा खोटारडेपणा केला असता तर त्यांना राजीनामा देऊन घरीच बसावे लागले असते, पण सुप्रीम कोर्टाने सात हजार कोटींचा घोटाळा पकडूनही मोदी हे पक्षाच्या व्यासपीठावर हारतुरे स्वीकारत आहेत व भ्रष्टाचार मुक्तीची प्रवचने झोडत आहेत. देशभरातील सर्व नामचीन भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणून मोदी कोणत्या विकासाची गाथा लोकांपर्यंत नेणार आहेत? अशोक चव्हाण यांच्यावर

भ्रष्टाचाराचे आरोप करणारे

मोदीच होते व आता त्यांना भाजपमध्ये घेऊन लगेच राज्यसभेवरही घेतले. चव्हाण यांच्या पाठोपाठ मध्य प्रदेशातून काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासाठीही भाजपने पायघडय़ा घातल्या असल्याचे वृत्त आहे. मध्य प्रदेश निवडणुकांत याच कमलनाथांच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपने प्रचार केला. कमलनाथ नसून हे ‘करप्शन नाथ’ असल्याचे मोदी व त्यांचे लोक जाहीर सभांतून सांगत होते. आता त्याच करप्शन नाथांच्या हाती मोदी विकासाची गाथा देऊन सर्वसामान्यांची थट्टा उडविणार आहेत. महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी, दादा भुसे वगैरे मंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपवालेच होते व आज हे सर्व लोक भाजपच्या विकास यात्रेचे भोई आहेत. छगन भुजबळ यांच्या घोटाळय़ाची फाईलच हरवल्याचा चमत्कार मोदी काळात घडला आहे. भ्रष्टाचारी, गुंड, दलाल यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने राजकारणात नवा पायंडा पाडला आहे. हीच त्यांच्या विकासाची गाथा आहे. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पन्नास-पन्नास कोटी रुपये फेकून विकत घेतले. भ्रष्ट मार्गाने सरकारे निर्माण करायची व त्या माध्यमातून देशाची लूट करायची हा मोदी सरकारचा गोरखधंदा बनला आहे. या धंद्यास विकास गाथा वगैरे संबोधून मोदी लोकांना मूर्ख बनवीत आहेत. स्वपक्षातील इमानदार कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून भाजप इतर पक्षांतील अनुभवी भ्रष्टाचाऱ्यांना सन्मानाने प्रवेश देत आहे. हे चित्र प्रत्यक्ष मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त विकास गाथेचे ढोंग उघडे पाडणारे आहे, पण मोदी यांना हे समजवायचे कोणी? भाजपने सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या थराला जायचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदारांपैकी 175 खासदार हे मूळ काँग्रेसचे आहेत. 2024 च्या निवडणुकीत मोदींना हा आकडा वाढवून काँग्रेसयुक्त भाजप करायचा आहे व यावर कोणी टीका केली तर मोदी म्हणतात, विरोधक चिखलफेक करतात. भ्रष्टाचाराच्या

चिखलात संपूर्ण भाजप

आज लोळते आहे व स्वतः मोदी, शहा, फडणवीस, हेमंत बिस्व सर्मा, कैलास विजयवर्गीय, महाराष्ट्रात नारायण तातू राणे यांच्या मुलांची भाषणे ऐकली तर चिखलफेक परवडली, ही वरळीची गटारे आवरा, असेच मोदी म्हणतील, पण शेवटी हे सर्व मोदीकृपेनेच सुरू आहे. मोदी यांनी सांगितले की, श्यामाप्रसाद यांनी जम्मू-कश्मीरचे 370 कलम हटविण्यासाठी आंदोलन केले व बलिदान दिले होते. मोदी काळात मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले. 370 कलम हटवले, पण कश्मीर आजही अशांत आहे व तेथे निवडणुका घेण्याची हिंमत मोदी दाखवू शकले नाहीत. कश्मीरातून 370 कलम हटवून श्रीमान मोदी यांनी नक्की काय दिवे लावले? 370 कलम हटवूनही हजारो कश्मिरी पंडितांची घर वापसी होऊ शकली नाही. कश्मिरी पंडितांना त्यांचा हक्क, अधिकार मिळू शकले नाहीत व ते निर्वासितांच्या छावण्यांतच जगत आहेत. तेव्हा 370 कलम हटवल्याचा तोरा मोदी यांनी मिरवू नये हेच बरे. प्रत्येक बुथवर पूर्वीपेक्षा 370 अधिक मते मिळविण्याचे आवाहन मोदी यांनी केले ते 370 कलमाची आठवण करून देण्यासाठीच. मोदी यांनी मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याचे धाडस दाखवले तर प्रत्येक बुथवर भाजपचा पराभव झालेला ते पाहतील. मोदी व त्यांचा पक्ष रशियाच्या पुतीनप्रमाणे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणुका जिंकतो. निवडणूक आयोगास त्या पापात भागीदार केले जाते. मोदी यांनी याबाबतीत भारताचा पाकिस्तान केला आहे व ते श्रीरामाच्या आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतात तेव्हा लोकांना हसू आवरत नाही. मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त विकासाची गाथा ही भ्रष्टाचाराच्याच समृद्ध मार्गावरून निघाली आहे. मोदी यांचे बोलणे लोक आता गांभीर्याने घेत नाहीत. त्यांचा नीलकंठ झाला आहे. इतर पक्षांतील भ्रष्ट नेत्यांचे विष ते रोज प्राशन करतात व विरोधकांच्या नावाने तांडव करतात. अंधभक्तही भांग पिऊनच टाळय़ा वाजवतात. काय करायचे?