सामना अग्रलेख – मोदी परिवाराचा फुगा!

स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांतील परिवारवादावर बोलणाऱ्या पंतप्रधानांना दुसऱ्यापक्षांमधील कुटुंबशाही भाजप परिवारात आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही नाहीत. रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये नाही. मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे. ‘मेरा देश मेरा परिवार’ हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे!

भारत देश हाच आपला परिवार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी पुन्हा जाहीर केले. त्यात त्यांनी नवीन काय सांगितले? ‘देशातील 140 कोटी जनता हेच माझे कुटुंब’ ही मोदी यांची आवडती टेप आहे. मागील नऊ-दहा वर्षांत त्यांनी ती उठता बसता वाजवली आहे आणि त्यामुळे ती आता घासली गेली आहे. देशाची 140 कोटी जनतादेखील ती ऐकून कंटाळली आहे. मात्र हे समजून घेतील ते मोदी कसले? त्यामुळे ‘मेरा भारत, मेरा परिवार’ हे पालुपद काही ते सोडायला तयार नाहीत. सोमवारी तेलंगणातील एका कार्यक्रमात त्यांनी ते पुन्हा म्हटले. वास्तविक, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे पालकच असतात. मोदी यांच्या आधीचे सगळे पंतप्रधानही या देशाचे कुटुंबप्रमुख म्हणूनच वावरले. तेव्हा देश हेच माझे कुटुंब असे म्हणणे म्हणजे आपण खूप वेगळे काहीतरी करीत आहोत, असे कोणी समजण्याचे कारण नाही. किंबहुना तेच तुमचे कर्तव्य असायला हवे. जनतेने सलग दोनदा त्याच विश्वासाने तुम्हाला निवडून दिले. मात्र हा विश्वास तुम्ही किती सार्थ ठरविला हा खरा प्रश्न आहे. देश म्हणजेच कुटुंब वगैरे फक्त तोंडी लावण्यापुरते आहे. प्रत्यक्षात तुमचे कुटुंब म्हणजे तुमचे उद्योगपती मित्र, तुमच्या सभोवती असलेले कोंडाळे हेच आहे. सोशल मीडियावरून तुमचा

उदो उदो करणाऱ्या

सायबर टोळय़ा हे तुमचे कुटुंब आहे. ‘मोदी मोदी’च्या नशेत तल्लीन ‘भगतगण’ म्हणजे तुमचा परिवार आहे. लोकशाहीमध्ये विरोधक, टीकाकार हेदेखील सत्ताधारी पक्षाने कौटुंबिक सदस्यच समजायचे असतात. मोदी राजवटीत हे चित्र कधीच दिसले नाही. काँग्रेस पक्ष आणि त्यांचे विचार याविषयी राजकीय मतभेद असू शकतात. सत्तेच्या राजकारणात एका पक्षाने दुसऱ्यापक्षाचा राजकीय पराभव करण्यातही अस्वाभाविक काहीच नाही. परंतु मोदी प्रथम दिवसापासून ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच अजेंडा पुढे रेटत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात, स्वातंत्र्योत्तर विकासात भाजपपेक्षा कितीतरी जास्त योगदान काँग्रेस पक्षाचे आहे, परंतु मोदी आणि त्यांचा पक्ष काँग्रेसमुक्त भारत या वेडाने पछाडला आहे. विरोधी पक्ष, नेते आणि टीकाकारच नव्हे तर पक्षांतर्गत स्पर्धक ठरू शकतील अशी भाजपची मंडळीही ‘मोदी कुटुंबा’च्या परिघाबाहेरच ठेवली जाते किंवा कुटुंबाबाहेर पडण्यास त्यांना भाग पाडले जाते. मोदी यांच्या हुकूमशाहीपुढे मान तुकविणारेच ‘मोदी का परिवार’चे सदस्य बनू शकतात. भाजपमधील ज्येष्ठांनाही ‘मार्गदर्शक’ बनवून परिघाबाहेरच ठेवले गेले. कोरोनासारख्या भयंकर काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेमळ कुटुंबप्रमुखाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली. त्यामुळेच

कोरोनाकाळातील कुटुंबवत्सल

उद्धव ठाकरे आजही जनतेच्या मनात कायम आहेत. हीच सल ‘मेरा देश, मेरा परिवार’ म्हणणाऱ्यांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेनेतील गद्दारांना मांडीवर घेतले आणि शिवसेनेत फूट पाडली. विरोधी पक्ष फोडणारे आज देशाला त्यांचे कुटुंब म्हणतात तेव्हा धक्काच बसतो. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांतील परिवारवादावर तोंड फाटेपर्यंत बोलणाऱ्यापंतप्रधानांना दुसऱ्यापक्षांमधील ‘कुटुंबशाही’ आपल्या राजकीय स्वार्थासाठी ‘भाजप परिवारा’त आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही होऊ शकलेले नाहीत. रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये येत नाही. मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे. ‘मेरा देश मेरा परिवार’ हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे!