सामना अग्रलेख – सर्वात मोठा ‘अपक्ष’ लष्कर हरले, इम्रान जिंकले!

पक्ष चोरून वा चिन्ह गोठवून जनतेची मने जिंकता येत नाहीत, हा पाकिस्तानच्या ताज्या निवडणुकीतून मिळालेला सर्वात मोठा धडा आहे. पण धडा घेईल ते पाकिस्तानी लष्कर कसले? लष्कर हरले, इम्रान जिंकले हाच पाकिस्तानी जनतेने दिलेल्या कौलाचा अर्थ आहे. तरीही लष्करी इच्छेनुसार आता तिथे पुन्हा एकदा शरीफ-झरदारी यांचे ‘बाहुले सरकार’ सत्तेवर आरूढ होत आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही इम्रान यांना सत्तेपासून रोखण्यात पाकिस्तानी लष्कर यशस्वी झाले असले तरी इम्रान यांनी तुरुंगातून ज्या हिमतीने लढा दिला, त्याला दाद द्यावीच लागेल!

पाकिस्तानी लष्कराला सदैव आपल्या इशाऱ्यावरच चालणारे सरकार पाकिस्तानात हवे असते. ऊठ म्हटले की उठणारे आणि बस म्हटले की बसणारे सरकार सत्तेवर आणायचे आणि अप्रत्यक्षपणे सत्तेची हुकूमत आपल्याकडे ठेवायची, हाच खेळ पाकिस्तानी लष्कर वर्षानुवर्षे खेळतो आहे. सत्तेवरील लष्कराच्या या नियंत्रणामुळे पाकिस्तानचे आजवर अपरिमित नुकसान झाले. तथापि, अजूनही पाकिस्तानात तोच तमाशा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेला राजकीय ‘सस्पेन्स’ दूर करण्यासाठी लष्कराने नवाज शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग व बिलावल भुत्तो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीत मनोमिलन घडवून आणले. पाक लष्कराने पडद्यामागून केलेल्या हालचालींनुसार नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ हे पुन्हा एकदा पाकिस्तानचे पंतप्रधान बनतील, तर बिलावल यांचे ‘अब्बा’ व दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पती असीफ अली झरदारी हेदेखील पुन्हा एकदा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून लवकरच शपथ घेतील. ‘लोकप्रिय इम्रान खान नको’ या एकाच सूत्रावर पाकिस्तानी लष्कर, ‘पीएमएल’ व ‘पीपीपी’ यांचे मतैक्य झाले व त्यातून लष्कराला हव्या तशा सरकारचा पाकिस्तानात पुन्हा एकदा जन्म झाला. वास्तविक निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासूनच माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेवढी खालची पातळी गाठता येईल, तेवढी पातळी पाकिस्तानी लष्कराने गाठली होती. निवडणुकीतील गैरप्रकार, लष्कराचा निवडणुकीतील अनिर्बंध हस्तक्षेप आणि लष्कराच्याच मर्जीतील हवे तसे सरकार आणण्यासाठी केलेला आटापिटा हा

सगळा मसाला

पाकिस्तानातील ताज्या निवडणुकीतही दिसला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांची लोकप्रियता वाढलेली पाहून पाकिस्तानी लष्कराने इम्रान यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा चंगच बांधला होता. त्याआधी लष्कराने इम्रान यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचले व शाहबाज यांना पंतप्रधान बनवले. त्यानंतरही इम्रान यांना व्यापक जनसमर्थन मिळत असलेले पाहून ना शेंडा ना बुडखा असलेली जुनी प्रकरणे उकरून काढत इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले. लष्कर एवढय़ावरच थांबले नाही, तर इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षावर निवडणूक लढवण्यावरच बंदी घालण्यात आली. पाकिस्तानचे सर्वेच्च न्यायालय, प्रशासनातील बडे अधिकारी व लष्कर सारेच या इम्रानविरोधी कटात सामील झाले होते. इम्रान यांच्या पीटीआय या राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली. पक्षाचे चिन्ह, झेंडा, ओळख सारेकाही गोठवले गेले. पाकिस्तानच्या मुजोर लष्करी सत्तेने इम्रान यांच्या पक्षाचे सर्वस्व हिरावून घेतले. तरीही इम्रान नेटाने लढत राहिले. इम्रान यांच्याकडे पक्षच नव्हता, तरीही त्यांचे समर्थक असलेले सर्व उमेदवार ‘अपक्ष’ म्हणून उभे राहिले व पाकिस्तानी असेंब्लीच्या निवडणुकीत सर्वाधिक 101 जागा इम्रान समर्थक अपक्षांनीच जिंकल्या. शरीफ यांच्या ‘पीएमएल’ला 75, तर झरदारी यांच्या ‘पीपीपी’ला केवळ 54 जागा मिळाल्या. पाकिस्तानी लष्कर, नवाज शरीफ आणि झरदारी यांच्यासाठी हा मोठाच धक्का होता. इम्रान हे तसे मूळचे क्रिकेटर व पाकिस्तानी संघाचे माजी कर्णधार. यामुळे डावपेच कसे आखायचे व आक्रमक खेळी करून सामना कसा फिरवायचा याचे

क्रिकेटमधून मिळालेले बाळकडू

इम्रान यांनी राजकारणात वापरले. त्यामुळे इम्रान यांच्याविरुद्ध कटकारस्थाने रचून त्यांना पायउतार करून व तुरुंगात रवानगी करूनही पाकिस्तानी लष्कर इम्रान यांना नमवू शकले नाही. उलट इम्रान यांनी लष्कराच्या सगळय़ा भानगडी चव्हाटय़ावर आणल्या. अमेरिकी सरकार व लष्करी अधिकारी यांचे कसे संगनमत आहे, हे ते पाकिस्तानी जनतेला पटवून देत राहिले. लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्याचा रिवाज असला तरी नॅशनल असेंब्लीच्या सर्वाधिक जागा जिंकणरा ‘सर्वात मोठा अपक्ष’ म्हणून इम्रान समर्थकांचा गट पुढे आल्याने पाकिस्तानच्या राजकारणात नवीनच पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र निकालानंतरच्या तब्बल 12 दिवसांनी लष्कराने इम्रान विरोधकांची मोट बांधून त्यावर तोडगा शोधला. आश्चर्य असे की, पाचेक वर्षांपूर्वी याच पाकिस्तानी लष्कराने इम्रान खान यांना पंतप्रधान करण्यासाठी जंग जंग पछाडले होते. त्या वेळी नवाझ शरीफ, असीफ अली झरदारी यांना सत्तेच्या सारीपाटापासून दूर ठेवण्यासाठी लष्कराने इम्रान यांचा प्यादा म्हणून वापर केला आणि आता इम्रानविरुद्ध शरीफ व झरदारी ही जुनी प्यादी लष्कराने वापरली. पक्ष चोरून वा चिन्ह गोठवून जनतेची मने जिंकता येत नाहीत, हा पाकिस्तानच्या ताज्या निवडणुकीतून मिळालेला सर्वात मोठा धडा आहे. पण धडा घेईल ते पाकिस्तानी लष्कर कसले? लष्कर हरले, इम्रान जिंकले हाच पाकिस्तानी जनतेने दिलेल्या कौलाचा अर्थ आहे. तरीही लष्करी इच्छेनुसार आता तिथे पुन्हा एकदा शरीफ-झरदारी यांचे ‘बाहुले सरकार’ सत्तेवर आरूढ होत आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही इम्रान यांना सत्तेपासून रोखण्यात पाकिस्तानी लष्कर यशस्वी झाले असले तरी इम्रान यांनी तुरुंगातून ज्या हिमतीने लढा दिला, त्याला दाद द्यावीच लागेल!