अच्छा काम करो… अच्छा दाम मिलेगा! गोळीबार केलापण मोबदला मिळाला नाही

सलमान खानच्या घरावर गँगस्टर अनमोल बिश्नोई याच्या सांगण्याप्रमाणेच गोळीबार झाला होता. तुम अच्छा काम करो, तुम्हे अच्छा दाम मिलेगा… असे आश्वासन देत बिश्नोईने हे गोळीबाराचे कांड घडवून आणले. शिवाय शस्त्र तसेच दुचाकी, घर भाडय़ाने घेण्यासाठी लागणारा पैसादेखील अनमोलने आरोपींना पुरवला होता. पद्धतशीर प्लानिंग करून हा गुन्हा करण्यात आला; पण मुंबई गुन्हे शाखेनेदेखील शिताफीने तपास करत 48 तासांत आरोपींना बेडय़ा ठोकल्या.

गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तो गुन्हे शाखा युनिट-9 कडे तपासासाठी सुपूर्द करण्यात आला. आरोपींना वेळीच पकडण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर होते. उपायुक्त दत्ता नलावडे, एसीपी महेश देसाई, वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पुराणिक, दीपक पवार, एपीआय महेंद्र पाटील, उत्कर्ष वझे या पथकाने तांत्रिक बाबींचा योग्य ताळमेळ साधत आरोपींचा अचूक माग काढला. आरोपींनी मुंबई सोडून सुरत गाठले. मग तिकडून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ते सार्वजनिक वाहनांचा वापर करत भुजमध्ये धडकले.

मूळचा बिहारचा असलेला सागर कामानिमित्त हरयाणा येथे गेला होता. तेथे मजुरीचे काम करत असताना तो बिश्नोई गँगच्या संपका&त आला. सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचे ठरल्यानंतर सागरच्या जोडीला विकीला घेण्यात आले. शिवाय, मुंबईत शस्त्र पुरवले, पनवेलमध्ये भाडय़ाने घर घेण्यासाठी व दुचाकी खरेदीसाठी पैसा पुरवला. कुठल्या वेळेला काय करायचे ते अनमोल दोघांना सांगत होता. कोणीही मध्यस्थी न ठेवता अनमोल थेट दोघा आरोपींच्या संपका&त होता, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पोलीस भाविक बनून मंदिरात पोहचले

सोमवारी भुजच्या त्या मातेनू मडात होमहवनचे आयोजन करण्यात आले होते. हवन झाल्यानंतर नागरिक मंदिरात दर्शनासाठी ये-जा करत होते. पोलिसांनी मंदिरातला माहोल पाहून ते स्वतः भाविक बनले आणि मंदिरात गेले. तेव्हा दोन तरुण मंदिरातील एका बाजूला डोक्याखाली बॅग घेऊन झोपलेले दिसून आले. त्यामुळे दोघांना उठवून चौकशी केली असता सलमानच्या घरावर गोळीबार करणारे आम्हीच अशी कबुलीच त्यांनी दिली.  आरोपी दहिसरहून बसने सुरतच्या दिशेने गेले होते, पण ती माहिती मिळेपर्यंत पोलिसांनी जवळपास 35 रेल्वेची तपासणी केली होती. इगतपुरी स्थानकात 30, तर आग्रा आणि राजकोट येथेही रेल्वेत तपासणी केली होती.

लगेच दोन पथके रवाना झाली

दोन्ही आरोपी आपल्या टप्प्यात आल्याचे स्पष्ट होताच निरीक्षक भारत घोणे तसेच केणी व अजय कदम हे पथक विमानाने राजकोटला पोहचले. मग त्यांच्यापाठोपाठ निरीक्षक अरुण थोरात, उपनिरीक्षक लेम्बे तसेच विजय थोरात व महेश धारवड हे पथक विमानाने अहमदाबादला गेले. दोन्ही पथके मग रस्तेमार्गाने भुजच्या दिशेने सुसाट निघाली. टार्गेट ठरलेल्या ठिकाणी कसे जायचे, कुठून जायचे याची माहिती वरिष्ठ अधिकारी दोन्ही पथकांना मुंबईत बसून देत होते. दरम्यान, लखमी गौतम यांनी भुजच्या पोलीस अधीक्षकाशी संपर्क साधून आरोपींना पकडण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेची पथके व भुज गुन्हे शाखेचे पथक यांनी एकत्रित धडक देत आरोपींना उचलले.