सांगली जिल्हय़ात संततधार, वारणा, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची आज दिवसभर संततधार सुरू होती. कमी-जास्त प्रमाणात जिह्यात सर्वत्र पाऊस झाला. त्यामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. कोयना आणि चांदोली धरण पाणलोटक्षेत्रात बुधवारी अतिवृष्टी सुरू राहिली. तेथे विक्रमी पाऊस सुरू असून, धरणातील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे.

सांगली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. बुधवारी जिह्यात सर्व भागांत चांगली हजेरी लावली. मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस, वाळवा, शिराळा, तासगाव, कडेगावसह सर्वच तालुक्यात दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाअभावी पेरण्या लांबल्या होत्या. खरीप वाया जाण्याची भीती असताना पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला आहे. बहुतांशी ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरू राहिली.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिसरातील नदी, ओढे-नाले, तलाव, धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. 24 तासांत चांदोली धरण परिसरात 67 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी दुपारी दोननंतर पावसाचा जोर मंदावला होता.