एका टर्ममध्ये दोन वेगवेगळ्या पक्षासोबत युतीचा विक्रम कुणी केला नव्हता, शरद पवार यांचा नितीश कुमारांना टोला

जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाची साथ सोडत भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे बिहारमध्ये ऱविवारी राजकीय उलथापालथ झाली. जदयू राजदचे सरकार कोसळून नितीश कुमारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. नितीश कुमारांनी आज नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इंडिया आघाडी व्हावी यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणणाऱ्या नितीश कुमारांनी हा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. एएनआयशी बोलताना शरद पवार म्हणाले, ”बिहारमध्ये जे काही घडले आहे ते इतक्या कमी दिवसात कधीच कुठेही घडलेले नाही. याआधी अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. मला आठवतं याच नितीश कुमारांनी देशातील भाजप वगळून इतर पक्षाच्या अध्यक्षांना आणि नेत्यांना पाटणा येथे निमंत्रित केले होते. भाजपला नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून विरोधकांनी एकजूट करावी, असे त्यांचे मत होते. पाटणा येथील बैठकीत त्यांनी एक प्रभावी भाषण केले. विरोधकांची एकजूट कशासाठी केली पाहीजे, त्याची आवश्यकता का आहे? यावरही त्यांनी त्यावेळी भाष्य केले होते. त्याप्रमाणे ते कामही करत होते. मात्र मागच्या १५ दिवसांत अचानक काय झाले? याची मला कल्पना नाही. त्यांनी त्यांची विचारधारा का सोडली, विरोधकांचे ऐक्य करत असताना ते ज्या गोष्टी सांगत होते, त्या त्यांनी अचानक का सोडल्या? याबाबत कळायला मार्ग नाही. आज त्यांनी अचानक भाजपाबरोबर सरकार स्थापन केले.” असे शरद पवार म्हणाले.