नववर्षाच्या संकल्पासाठी दर्शनवारी… शिर्डी, अक्कलकोट, तुळजापूर, शेगाव गजबजले

नवीन वर्षाचे वेध लागले असून देवाच्या द्वारी भक्तांची प्रचंड मांदियाळी असे चित्र सध्या राज्यभरात दिसत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी विविध ठिकाणच्या मंदिर परिसरातील हॉटेल्स, भक्तनिवास हाऊसफुल्ल झाले आहेत. नवीन वर्ष सुख आणि समाधान घेऊन येवो, भरभराटीचे जावो असा आशीर्वाद द्यावा देवा, असे आर्जव करताना नव्या वर्षात ध्येय साध्य करण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागू, असा संकल्प करताना भाविक दिसत आहेत.

तुळजापूरची तुळजाभवानी, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, सिद्धिविनायक गणपती, महालक्ष्मी मंदिर… जिकडे तिकडे भाविकांची तुडुंब गर्दी दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या चरणी डोके ठेवून सकारात्मक होण्याच्या हेतूने देवस्थाने गजबजली आहेत.

आज मंगळवारी दत्तजयंतीनिमित्त अक्कलकोटच्या श्री स्वामी मंदिरात भाविकांची तुडुंब गर्दी होती, अशी माहिती अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. पहाटे 5 वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहन महाराज पुजारी यांच्या उपस्थितीत मंदार महाराज पुजारी आणि व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते काकड आरती झाली. त्यानंतर स्वामीभक्तांसाठी मंदिर खुले करण्यात आले. दत्त जयंतीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱयातून दिंडी आणि पालखी सोबत पायी चालत आलेली भक्तांची स्वारी आज अक्कलकोट येथे विसावली. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. 23, 24 आणि 25 डिसेंबरपासूनच मंदिरात प्रचंड गर्दी होत असून उद्या श्री स्वामींच्या पालखीची वटवृक्षापासून समाधी स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष इंगळे यांनी सांगितले.

अक्कलकोट येथे रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मुंबईतील भांडुप, बार्शी, भातम्बरे येथून पालखी आणि दिंडी आल्या आहेत. देवस्थानच्या विश्वस्त उज्वला सरदेशमुख यांच्या उपस्थितीत सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्तजन्म आख्यान, वाचन, दत्त सांप्रदायिक भजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शेगावातही श्रींच्या दर्शनासाठी लाखो भाविक संत नगरीत दाखल झाले आहेत. भक्तांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता व्यवस्थापनाने भाविकांसाठी सुसज्ज आणि चोख अशी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.
आज दत्तजयंतीनिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी येतील दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हेते. मंदिरात पहाटे 3.30 वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना’ पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली, अशी माहिती श्री नृसिंहदेव संस्थानचे अध्यक्ष संतोष खोंबरे यांनी दिली.

रोज एक ते दीड लाख भाविकांची गर्दी
वर्ष संपत आल्याने आणि नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या चरणी डोके ठेवून करण्याच्या हेतूने मंदिरात रोज एक ते दीड लाख भाविकांची गर्दी होत असल्याची माहिती तुळजापूर देवस्थानचे मंदिर व्यवस्थापक सोमनाथ माळी आणि जनसंपर्क अधिकारी संकेत वाघे यांनी दिली.

सिद्धिविनायक, श्री महालक्ष्मी मंदिरातही गर्दी
मुंबईतील श्री महालक्ष्मी मंदिर आणि प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरही गजबजले. देवीच्या आणि बाप्पाच्या जयघोषाने मंदिरे दुमदुमली. श्री महालक्ष्मी मंदिरात शनिवारी प्रचंड गर्दी होती, असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले. मंदिरांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. भाविकही शिस्तबद्धरीत्या रांगेतून जाऊन सुरक्षा रक्षांना सहकार्य करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दर्शन रांगेत कुठेही गोंधळ होत नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.

शिर्डीही गजबजली
शिर्डीमध्येही भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दिवसाला एक ते दीड लाख भाविक येत असल्याचे देवस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सांगितले. रांगेत तीन ते साडेतीन तास लागत असून प्रचंड गर्दी होत असल्यामुळे भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून तिरुपती देवस्थानप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.

नव्या वर्षाचे संकल्प
नव्या वर्षात आरोग्याची काळजी घेईन. रोज व्यायाम, योगा करीन.
बचतीवर भर देणार, वायफळ खर्च टाळून उधळपट्टी कमी करणार.
बायकोला घरकामात शक्य तितकी मदत करणार.
व्यसन टाळणार वजन कमी करणार.
मोबाईल, सोशल मीडियावर वेळ घालवणार नाही, वाचन वाढवणार.
कमी बोलणार, रागावर नियंत्रण ठेवणार. चहा कमी करणार.

तुळजापुरात भाविक तीन ते साडेतीन तास गर्दीत उभे राहून दर्शन घेत आहेत. मुखदर्शनासाठी एक ती दीड तास लागत असून पेड दर्शनाच्या रांगेत अर्धा ते पाऊण तास लागत आहे.

साईदर्शनासाठी मास्कसक्ती
शिर्डी संस्थानने कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून दर्शनासाठी येणाऱया भाविकांना आजपासूनच मास्कची सक्ती केली आहे.