माझे पद मान्य नव्हते, तर अमित शहा माझ्याकडे का आले होते? उद्धव ठाकरे यांचा रोखठोक सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील वरळीत जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा या महापत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची चिरफाड केली. यावेळी नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा अयोग्य आहे, याबाबत तज्ज्ञांनीही माहिती दिली. तसेच उद्धव ठाकरे यांनी सडेतोड मुद्दे मांडत ही लढाई आता आपण जनतेच्या न्यायालयात नेत आहोत, असे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयावर आपला विश्वास आहे. मात्र, आता जनताच याबाबत निर्णय घेणार आहे.

आपण गेल्या आठवड्यात एका लवादाने दिलेल्या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ती शेवटची आशा असली तरी या देशातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जनता त्यांच्या न्यायालयात आम्ही आलो आहोत. लोकशाहीत जनता ही सर्वोच्च असते. सरकार कोणाचेही असले तरी सत्ता जनतेतीच असायला हवी. त्यामुळे आता न्याय मिळायला हवा. पुरावा की गाडावा, असा प्रश्न निर्माण होतो.

मिंधे आणि नार्वेकर यांनी कोणत्याही संरक्षणाशिवाय जनतेत यावे आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय द्यावा. त्यानंतर जनताच त्यांना पुरावा, गाडावा की तुडवावा याचा निर्णय घेईल. या निकालाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ते देखील उच्च न्यायालयात गेले आहे. त्यांना फक्त वेळकाढूपणा करायचा आहे. मिंध्यानीही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्यांनाही हा निकाल मान्य नाही, असे स्पष्ट होते. आता आपण त्यांना आव्हान देतो, अधिवेशन बोलवा आणि विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणा. आपण त्याला पाठिंबा देऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, अशी परिस्थिती आहे. आपण फक्त बघत राहणार की लोकशाहीची थट्टा करणाऱ्यांचे मढे करायचे. निवडणूक आयोगाविरोधातच याचिका करण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे ती कागदपत्रे मान्य करा, अन्यथा आम्ही भरलेले पैसे परत द्या. आपण सर्व परखड आणि उघडपणे बोलत आहो. कोण काय करतेय ते तुम्ही बघून घ्याल, हा विश्वास आहे.

आपले त्यांनी आव्हान आहे की, याबाबतचा निकाल नंतर द्या. आता निवडणुका लावा. मी मशाल घेऊन येतो. तुम्ही आझे चोरलेले धनुष्य घेऊन या, बघूया जनता कोणासोबत आहे. असे खुले आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना दिले. आता दाखवलेल्या पुरव्यावरून काय परिस्थिती आहे, ते दिसते. ते आम्हाला गिळायला निघाले आहेत. त्यांची 24 तासांनी परिस्थिती काय होते, ते समजेल. मी राजीनामा का दिला असा सवाल अनेकजण करतात. मात्र, आपल्याला सत्तेचा मोह नाही. त्यामुळे एका क्षणात पद सोडून मातोश्रीवर आलो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हा एक कट असल्याचे दिसून येते. तत्कालीन राज्यपालही या कटात सहभागी झाले होते. ही फक्त शिवसेनेची लढाई नाही. या देशात लोकशाही जिंवत राहणार की नाही, याची आहे. या देशात सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व आहे की लवाद सर्वोच्च आहे, याचाही निर्णय होणार आहे. आम्ही पात्र की अपात्र ते जनता ठरवेल. मात्र, देशात लोकशाही राहणार की नाही, हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे ही लढाई आता देशाची झाली आहे.

याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जल्लादला दिले होते. मात्र, याच्या जन्माचा पुरावा नसल्याने फाशी कशी देऊ, असे जल्लाद म्हणतोय. निवडणूक आयोगाकडे पक्षाची घटना नाही, असे ते सांगत आहेत. मात्र, आता सर्व पुराव्यानिशी जनतेसमोर आले आहे. जे.पी. नड्डा म्हणाले होते, आता देशात एकच पक्ष राहणार म्हणजे भाजपा. तेव्हापासून या कटाची सुरुवात झाली. तेव्हापासून महाराष्ट्रात आणि देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. एका पक्षाच्या अध्यक्षाने केलेले हे विधान निवडणूक आयोगाला मान्य आहे का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

रामशास्त्री आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरुष झाले, त्याच मातीतून त्यांनी लोकशाही संपवायला सुरूवात केली आहे. ही महाराष्ट्राची माती आहे. संपवणाऱ्यांनाच ही माती गाडून टाकते, हा इतिहास आहे. जर 1999 ची पक्षाची घटना शेवटची असे ते म्हणतात. माझे पदच त्यांना मान्य नव्हेत, तर 2014 आणि 2019 मध्ये माझी सही घेण्यासाठी मला का बोलावले होते, असा सवालही त्यांनी केला. त्यावेळी मोदी म्हणाले होते, आता बाळासाहेब नाही, पण महत्त्वाची चर्चा करायची असेल तर मी उद्धवजींशी चर्चा करतो, असे म्हणाले होते ते का.

अमित शहा आपल्याकडे आले होते. माझे पदच मान्य नव्हते, तर मग माझा, माझ्या शिवसेनेचा पाठिंबा घेण्यासाठी का आला होता. त्यावेळी शिवसेना नाही, याचे अध्यक्षपद निवडणूक आयोगाकडे नोंद नाही, हे त्यांना माहिती नव्हते का,असा सवालही त्यांनी केला. त्यांच्यासोबत गेलेल्या मिंध्यांना पदे आणि मंत्रिपदे कोणी दिली होती. सर्व अधिकार कोणाकडे आहेत, याचे सर्व पुरावे जनतेसमोर आले आहेत. आता जनतेलाही सत्य समजले आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्याचसोबत आता ही लढाई आपण महाराष्ट्रातील जनतेसमोर नेत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.