केजरीवाल यांच्या वृद्ध मातापित्यांचीही चौकशी होणार; चौकशीच्या नावाखाली मोदी सरकारचा जाच

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना कथितरीत्या झालेल्या मारहाणप्रकरणी आता दिल्ली पोलिसांकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांचीही चौकशी करण्यात येणार आहे. दिल्लीतील कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी 1 जूनपर्यंत जामीन मिळालेल्या केजरीवाल यांना चौकशीच्या नावाखाली विविध प्रकारे जाणूनबुजून त्रास देण्याचे धोरण मोदी सरकारकडून अवलंबले जात असून केजरीवाल यांनीही दिल्ली पोलिसांची आईवडील आणि पत्नीसोबत वाट पाहात असल्याचे एक्सवरून प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर केजरीवाल यांनीच आम्हाला वेळ दिली नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांकडून चौकशीच्या नावाखाली अरविंद केजरीवाल यांच्या आईवडिलांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी केला आहे. स्वाती मालिवाल मारहाणप्रकरणी केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.

पोस्टमध्ये केजरीवालांनी काय म्हटले?

केजरीवाल यांनी आई-वडील आणि पत्नीसोबत घरात बसल्याचा पह्टो आणि एक व्हिडीओ एक्सवरून पोस्ट करत म्हटले आहे की, आईवडील आणि पत्नीसोबत पोलिसांची वाट पाहत आहे. काल पोलिसांनी पह्न करून आईवडिलांच्या चौकशीसाठी वेळ मागितली होती. पण, ते येणार की नाही, याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही, असे केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.