जम्मू-कश्मीरच्या ‘तहरीक-ए-हुर्रियत’ संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

जम्मू-कश्मीरला दहशतवादापासून मुक्त करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मुस्लिम लीग जम्मू-कश्मीर (मसरत आलम ग्रुप) नंतर आता केंद्र सरकारने तहरीक-ए-हुर्रियत या संघटनेवर बंदी घातली आहे.

तहरीक-ए-हुर्रियत ही संघटना देशविरोधी प्रचार आणि जम्मू-कश्मीरमध्ये फुटीरवादाला खतपाणी घालण्यासाठी दहशतवादी कारवाया करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर या संघटनेवर UAPA कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दुपारी ट्विट करत दिली.

तहरीक-ए-हुर्रियत, जम्मू-कश्मीर संघटनेला UAPA अंतर्गत बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळे करण्यासाठी आणि येथे इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी ही संघटना काम करत होती. जम्मू-कश्मीरमध्ये अलिप्तवादाला चालना देण्यासाठी हा गट हिंदुस्थानविरोधी प्रचार आणि सातत्याने दहशतवादी कारवाया करत असल्याचे आढळून आले आहे. देशविरोधी कारवायात गुंतलेल्या व्यक्तींचा आणि संघटनांचा डाव उधळून लावला जाईल, असे अमित शहा यांनी एक्स (ट्विटर) वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याआधी 27 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने मुस्लिम लीग जम्मू-कश्मीर संघटनेवर बंदी घातली होती. UAPA कायद्यांतर्गत या संघटनेवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. केंद्र सरकारने आतापर्यंत 43 संघटनांना दहशतवादी संघटना घोषित केले आहे. यात अनेक खलिस्तानी संघटनांचा तसेच लश्कर-ए-तोएबा, जैश-ए-मोहम्मद, लिट्टे आणि अलकायदाचाही समावेश आहे.