छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, तेलंगाणामध्ये तणाव

तेलंगाणातील सिद्दीपेट जिल्ह्यामधल्या गजवेल शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लघुशंका केल्याच्या संशयातून वाद निर्माण झाला असून या वादातून हिंदू आणि मुसलमान असा संघर्ष पेटला आहे. ज्या व्यक्तीने लघुशंका केल्याचा संशय आहे ती व्यक्ती दारूच्या नशेत होती. लोकांनी त्याला शोधून काढला आणि नग्न करत त्याची धिंड काढली. यामुळे हिंदू आणि मुसलमानांमध्ये हिंसा भडकली. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद क्षमवण्याचा प्रयत्न केला. या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन देत पोलिसांनी जमावाला शांत केलं.

या घटनेचा निषेध करण्यासाठी गजवेल शहर बंदची हाक देण्यात आली होती. दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. गजवेल मतदारसंघ हा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा मतदारसंघ आहे. मुसलमानांच्या संघटनांनी हिंसाचार सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे.