घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाचे रहस्य कायम

दहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाचे कोडे अद्याप उलगडले नाही. या खुनाच्या तपासाबाबत मात्र उलटसुलट चर्चा असून, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या तपासावर नातेवाईकांकडून आरोप होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अनेकांचे ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट केली असली तरी त्यातून काहीही मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा नव्याने कसून तपास करण्यात यावा, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिले आहेत.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळेवाडी, वडदरा (बोटा) येथे राहणारे उत्तम बाळाजी कुऱहाडे (वय 63) यांची राहत्या घराच्या पडवीत धारदार हत्याराने हत्या करण्यात आली हेती. ही घटना एप्रिल 2023 मध्ये घडली होती. सुरुवातीला बिबटय़ाच्या हल्ल्यात कुऱहाडे यांचा मृत्यू झाला असावा, अशी अफवा उठवण्यात आली होती. त्यामुळे अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर मात्र तो खून असल्याचे उघड झाले होते, त्यामुळे घारगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर स्वतः करीत आहेत.

या प्रकरणी तपास करताना जवळजवळ चार ते पाच व्यक्तींची ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली. मात्र यामधून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नेमका आरोपी कोण हे अद्यापपर्यंत पोलिसांना कळलेले नाही. मात्र, या तपासात पोलीस खरे आरोपी सोडून इतरांनाच त्रास देत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ज्या नातेवाईकांची ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट करण्याबाबत त्यांनी पोलिसांना दोषी धरले आहे. विनाकारण आम्हाला त्रास दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी पुन्हा कसून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

मयत व्यक्तीच्या खात्यातून पैसे काढले कसे?

उत्तम कुऱहाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खात्यातून लाखो रुपये काढल्याची चर्चा आहे. पण बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यक्तीची सही अथवा अंगठा लागतो. त्यामुळे कुऱहाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यातून लाखो रुपये कसे आणि कोणी काढले याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. तसेच यावर पोलीस अधिकारी मौन बाळगून आहेत.