महिनाभरातील तिसरी घटना; मालिकेच्या सेटवर घुसला बिबटय़ा 

गेल्या काही दिवसांपासून गोरेगावच्या फिल्मसिटी अर्थात चित्रमहर्षी दादासाहेब फाळके चित्रनगरीत सेटवर बिबटय़ाचा वावर पाहायला मिळत आहे. बुधवारी एक बिबटय़ा त्याच्या बछडय़ासह सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर फिरताना दिसला. त्यामुळे सेटवर उपस्थित असलेल्या कलाकार आणि क्रु मेंबरमध्ये घबराट पसरली. सेटवर बिबटय़ा घुसल्याची महिनाभरातील ही तिसरी घटना असल्याने फिल्मसिटीतील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बुधवारी बिबटय़ाने स्टुडिओमध्ये प्रवेश केला तेव्हा सेटवर 200 हून अधिक लोक उपस्थित होते. या घटनेत एखाद्याला जीव गमवावा लागला असता. गेल्या काही दिवसांत अशी ही तिसरी किंवा चौथी घटना आहे. सरकार यावर ठोस उपाययोजना करत नाही, असा सवाल  ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी उपस्थित केला आहे.