आणखी दीड महिना टोमॅटोचे दर चढेच राहणार; मुंबईत अजूनही डबल सेंच्युरी, इतर भाज्याही कडाडल्या 

>>दीपक पवार 

नागरिकांना किफायतशीर दरात टोमॅटो मिळावेत यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश नाफेड आणि एनसीसीएफला दिले होते. परंतु टोमॅटो हा नाशिवंत माल असल्यामुळे नाफेड काही टोमॅटो खरेदी करत नसून दर अजूनही अनेक ठिकाणी 140 ते 160 तर उत्तम दर्जाचा टोमॅटो 200 रुपयांना मिळत असल्याचे चित्र आहे. आवक कमी झाल्याने इतरही भाज्याही कडाडल्या असून आणखी दीड महिना टोमॅटोचे दर चढेच राहणार असल्याचे शेतकरी आणि व्यापाऱयांनी म्हटले आहे.   

पावसाळय़ामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांची टोमॅटोची पिके खराब झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे इतर पिकांचेही प्रचंड नुकसान झाल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोसह सर्वच भाज्यांची आवक कमी आहे. परिणामी अनेक भाज्यांनी शंभरी गाठल्याचे चित्र आहे. केंद्राने नाफेडला निर्देश देऊन 10 ते 15 दिवस उलटले तरीही टोमॅटोचे दर चढेच असल्याचे कुर्ल्याचे भाजीविक्रेते राजेश साळे यांनी सांगितले. तर टोमॅटो आणि इतर भाज्याही कडाडल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजट कोलमडले असून टोमॅटो तर जेवणातून हद्दपारच केल्याचे एका गृहिणीने सांगितले.  

नाफेड केवळ कांदा, लसूण किंवा जो माल टिकेल असाच माल खरेदी करत असून टोमॅटोची खरदी नसल्याचे जुन्नरमधील शेतकऱयांनी सांगितले. नाशिक, पुण्यासारख्या ठिकाणी टोमॅटोच्या एका कॅरेटचे 1700 ते 1800 रुपये मिळत असून एपीएमसी मार्केटमध्ये 2500 ते 3600 रुपये एका कॅरेटचे मिळत आहेत. मुंबईत टोमॅटोचे दर 200 रुपयांपर्यंत जात असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.  

सध्या कुठून येतोय सर्वाधिक टोमॅटो 

नगर, संगमनेर, नाशिक तसेच नारायणगाव येथून टोमॅटोची आवक होते आहे.  

पावसामुळे आवक घटली 

मुसळधार पावसामुळे टोमॅटोची आवक घटली असून सध्या टोमॅटोच्या 30 ते 40 गाडय़ाच येत असल्याची माहिती एपीएमसी मार्केटमधील व्यापारी शंकर पिंगळे यांनी दिली. यापूर्वी दिवसाला टोमॅटोच्या 70 ते 80 गाडय़ा येत होत्या. आवक कमी भाज्यांचे दर कडाडले असून टोमॅटोला किलोमागे 80 ते 100 रुपये दर शेतकऱयांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवारी टोमॅटोच्या एका कॅरेटला 3600 रुपये दर देण्यात आला.  

भाज्या      आताचे दर       पूर्वीचे दर 

            (किलोमागे)     (किलोमागे)

भेंडी            80               40

गवार          100              60 

वांगी           60               40

फ्लॉवर        100               60

शिमला मिरची 160             100

कारले          80               60

तोंडली         80                40

आले          240              160

मिरची         160              120

कोंथिबीर      100 (जुडी)       30 (जुडी) 

आता टोमॅटोच खायचे बंद केले पाहिजे. सर्वच भाज्या कडाडल्यामुळे आता खायचे काय हा प्रश्नच आहे. किचनचे सगळे बजेट कोलमडलेय. 

उषा सोनावणे, ग्राहक, शीव

पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. टोमॅटोच्या गाडय़ांमध्ये प्रचंड घट झाली असन दर अद्याप चढेच आहेत.  

शंकर पिंगळे, संचालक, 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती 

उत्पादनात प्रचंड घट 

आणखी एक ते दीड महिने टोमॅटोसह इतर भाज्यांचे दर चढेच राहतील, असे जुन्नरमधील शेतकऱयांनी सांगितले. ज्या जुन्नरमध्ये टोमॅटोचे भरघोस उत्पादन घेतले जाते त्या जुन्नरमध्ये यंदा 80 ते 85 हजार कॅरेट टोमॅटोच्या जागी केवळ 20 ते 25 हजार कॅरेट टोमॅटोचे उत्पन्न घेण्यात आल्याचे शेतकऱयांनी सांगितले.  

यंदा टोमॅटोत 1 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणूक केली, मात्र हाती केवळ चार ते साडेचार हजारच पडले. कारण चट्टय़ा रोगामुळे टोमॅटो खराब झाला. जे बागायतदार आहेत त्यांनाच अधिक नफा होतोय. कारण टोमॅटोसह इतर पिकेही मोठय़ा प्रमाणावर घेतात. टोमॅटो नाशिवंत असल्याने त्यात गुंतवणूक करून नाफेडला नुकसान सहन करायचे नाही. 

अनिल जगताप, शेतकरी, जुन्नर