नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडली, वीज गुल

नगर शहरासह जिह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱयासह पाऊस झाला. उपनगरांसह केडगाव, चास आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.

नगर शहरामध्ये वादळी वाऱयासह पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी फलक आणि झाडे पडल्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी विद्युत तारासुद्धा तुटल्यामुळे वीज गुल झाली होती.

जामखेडमध्ये वीज पडून चार जनावरे दगावली

जामखेड ः  जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून अवकाळीचा तडाखा सुरू आहे. आज सायंकाळी विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. यात वीज पडून तालुक्यात दोन गायी, एक बैल, एक वासरू मृत्युमुखी पडले आहे. तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्युमुखी पडला होता. आज कुसडगाव येथील बिभिषण रामचंद्र भोरे यांची गाय, जवळके येथील अंकुश वाळुंजकर यांची गाय, दादासाहेब हाडोळे यांचा बैल, तर भुतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे.

पाथर्डीत पत्र्याची शेड कोसळली

पाथर्डी ः वादळी वाऱयाने तालुक्यातील फुंदे टाकळी, कोळसांगवी व पिंपळ गव्हाण या भागातील शेतकऱयांच्या जनावरांच्या छपरासह विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली. फंदे टाकळी शिवारात वादळी वाऱयामुळे अनिल नामदेव फुंदे यांच्या शेतातील असलेल्या शेळीपालनासाठी बांधलेली पत्र्याची शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच शिवारातील विजेचे खांब, झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

पारनेरमध्ये वादळी पाऊस

पारनेर ः पारनेर परिसरासह पानोली, वडुले, गोरेगाव, डिकसळ या गावांना वादळी वाऱयासह झालेल्या पावसाने झोडपले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱयामुळे परिसरात काहीकाळ भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे अर्धा तास पावसाचे थैमान सुरू होते.