रत्नागिरीत दोन डाकविभाग सुरू करावेत, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल युनियन रत्नागिरीची मागणी

डाक विभागाचे मुख्यालय रत्नागिरीत असल्यामुळे मंडणगड, दापोली येथील ग्राहकांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे डाक विभागाचे विभाजन होऊन रत्नागिरी आणि चिपळूण असे दोन डाक विभाग सुरू करावेत, अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल युनियन रत्नागिरीने खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे.

डाक विभागाच्या विविध सेवा पुरविताना काही अडीअडचणी निर्माण होतात. अशावेळी रत्नागिरीतील डाक विभागात यावे लागते. रत्नागिरी जिल्हा 9 तालुक्यांत विभागला गेला आहे. त्यात मंडणगड आणि दापोली हे दोन तालुके एका टोकाला आहेत. त्या तालुक्यातील ग्राहकांना कामासाठी रत्नागिरीत येणे त्रासदायक ठरते. 250 ते 300 कि.मी. चा प्रवास करावा लागतो. त्यामध्ये वेळही जातो आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यांत दोन ठिकाणी डाक विभाग सुरू करावेत. एक रत्नागिरीत आणि दुसरा चिपळूणमध्ये असावा, अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल यूनियन रत्नागिरीने केली आहे. चिपळूणमध्ये डाक विभाग झाल्यास मंडणगड, दापोली, खेड आणि गुहागरच्या नागरिकांना सोयीचे ठरेल असे नॅशनल युनियन ऑफ पोस्टल युनियन रत्नागिरीने म्हटले आहे.