निवडणुकीत तुमची सत्तेची मस्ती फाडू, उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही.

सत्तेचा माज आलेल्या मिंध्यांनी शिवसैनिकांचे मंदिर असलेली शाखा बुलडोझर लावून पाडली, पण खरा बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठी मी स्वतः मुंब्य्राच्या रस्त्यावर शिवसैनिकांचा बुलडोझर घेऊन आलो आहे. मर्दाची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवा आणि आम्हाला भिडा, असे जबरदस्त आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना दिले. दिल्लीच्या कृपेने सत्तेत बसलेल्या नेभळट कठपुतली आणि बाहुल्यांनो, तुम्ही आमची पोस्टर्स फाडली… एवढंच सांगतोय, निवडणुकीत आम्ही तुमची मस्ती फाडू, अशी गर्जनाच उद्धव ठाकरे यांनी केली.

शंकर मंदिर शाखेची पाहणी केल्यानंतर शिवसैनिक, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व मुंब्रावासीयांशी त्यांनी संवाद साधला. माझ्या सर्व मर्द, लढवय्या भगिनींनो आणि मातांनो, अशी साद उद्धव ठाकरे यांनी घातली तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. ते म्हणाले, आज संपूर्ण ठाणे आणि मुंब्रा रस्त्यावर उतरला आहे; कारण गेल्या काही दिवसांपासून ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. त्या नेभळटांना इतपंच सांगतो, तुमची मस्ती आम्ही उतरवणारच.

पोलिसांना धन्यवाद! त्यांनी शाखाचोरांचे रक्षण केले

उद्धव ठाकरे म्हणाले, मला पोलिसांना धन्यवाद द्यायचे आहेत; कारण त्यांनी शाखेच्या मालकापासून शाखाचोरांचे रक्षण केले आहे. अवघा महाराष्ट्र पाहतोय की, प्रशासन किती हतबल आहे. मी बॅरिकेडस् तोडून पुढे जाऊ शकलो असतो, पण आज जर काही इकडेतिकडे झालं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. तशी सत्तेची गादी भोगणाऱ्या महाराष्ट्रातील चोरांनी ती आधीच घालवली आहे, अशा शब्दांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांचा समाचार घेतला.

पोलीस त्यांचे रक्षण करणार आणि आमच्यावर दंडुके चालवणार हे चालणार नाही

पोलिसांकडून गद्दारांचे संरक्षण होणार आणि आमच्यावर दंडुके चालवणार हे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. गद्दारांचे राजकीय आयुष्य संपत आले आहे. हे राजकारणातील थोडय़ा वेळाचे सोबती आहेत. त्याच्यानंतर त्यांचे काय होणार, गद्दारीचा शिक्का तर आहेच, पण चोर म्हणून लागलेला शिक्का त्यांना पुसता येणार नाही, असेही ते म्हणाले.

तर यांचे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकेल

आज तुम्ही दिल्लीच्या कृपेने सत्तेवर बसले आहात, पण कठपुतली बाहुल्यांनो, मर्दांची औलाद असाल तर पोलीस बाजूला ठेवून आम्हाला भिडायला या. आमची तयारी आहे. आज तुमच्या सगळय़ांच्या सोबतीने समोर जाऊन उभा राहिलो. बघतो कोणाची हिंमत आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

एकच निर्धारपराभूत करा गद्दार

आता निवडणूक कोणतीही येऊ द्या. या गद्दारांचे डिपॉझिट महापालिकेपासून लोकसभेपर्यंत जप्त करून त्यांना घरी पाठवा. अरे इन गद्दारों का राजकीय जीवन अब कितना बाकी है… यह कुछ दिन के मेहमान है. ज्यांनी यांना महापालिका आणि लोकसभा, विधानसभेत पाठवले ते आमच्या सोबत आहेत. आता एकच निर्धार… पराभूत करा गद्दार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.