आरोपीच्या भेटीला न्यायमूर्ती गेल्यास न्यायाची अपेक्षा कशी करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल; सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या म्हणजेच 10 जानेवारी रोजी निकाल देण्यात येणार आहे. या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोनवेळा भेट झाली होती. या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. उद्या देण्यात येणारा निकाल हा देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असणार आहे असे ठाकरे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. म्हणजेच ते या लवादाचे अध्यक्ष आहेत. ‘लवादाचे अध्यक्ष दोनवेळेला उघड उघडपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन भेटले. ते ज्या भूमिकेत आहेत आत्ता त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटले आहेत,’ असे ठाकरे यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, “आमच्यादृष्टीने मुख्यमंत्री आरोपीच आहेत कारण आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेचा खटला दाखल केला आहे. जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर आम्ही यांच्याकडून कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी ? ज्या पद्धतीने या केसची हाताळणी सुरू आहे त्यावरून लोकशाहीचा खून होतोय की काय असी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत. आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडून आहेच शिवाय आम्ही ही परिस्थिती लोकांच्याही निदर्शनास आणू इच्छितो.”

उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत बोलताना पुढे म्हटले की, आरोपी आणि न्यायाधीशाची मिलीभगत आहे का ? असेल तर हा वैयक्तिक खटला नसून पुढे देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही का हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल.

शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल आणि निर्देशासंदर्भातील ठळक बाबी वाचून दाखवल्या. यानंतर त्यांनी नार्वेकर-शिंदे भेटीबबाबत बोलताना म्हटले की, ” ही भेट मतदारसंघातील कामांसाठी होती असं सांगितलं जाऊ शकतं मात्र अशा कामांसाठीची चर्चा बंद दाराआड होत नाही, त्यासाठी अधिकाऱ्यांना बोलावलं जातं, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमसूचीत बैठकीचा उल्लेख असतो. अशी कोणताही तपशील काल जाहीर झालेला नाही. 16 आरोपींमध्ये एकनाथ शिंदे यांचा पहिला नंबर आहे. त्यामुळे आरोपी आणि अध्यक्षांची भेट होत असेल तर या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.” विधानसभा अध्यक्ष आणि आरोपी यांच्यातील भेटीची बाब आपण सर्वोच्च न्यायालयाला अ‍ॅफिडेव्हीटच्याद्वारे निदर्शनास आणून दिली असल्याचे परब यांनी सांगितले.