वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार, थकीत कर्ज प्रकरणी युनियन बँकेची कारवाई

बीड जिल्ह्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर 203 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी युनियन बँक या कारखान्याचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याच्या लिलावाची नोटीस एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी जीएसटी थकवल्या प्रकरणी या कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती.

युनियन बँक ऑफ इंडियाने 203 कोटींच्या थकीत कर्जप्रकरणी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे. हा लिलाव 25 जानेवारी रोजी होणार आहे. परळी परिसरातीलच नाही तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातून गाळपासाठी या कारखान्याला ऊस येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या कारखान्याचा मोठा आधार होता. एकेकाळी आशिया खंडात क्रमांक एकचा असलेला सहकारी साखर कारखाना आता बंद असून या कारखान्याचा लिलाव होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.