अंबड ग्रामस्थांनी मोदी सरकारच्या संकल्प रथाला गावातून हुसकवले; सरकारविरोधात संताप व्यक्त

वाढत्या महागाईने शेतकरीवर्गासह शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य माणूस होरपळून निघाला आहे. त्यामुळे शासकीय अधिकार्‍यांनी आमच्या गावात मोदी सरकार संकल्प रथ आणू नये. शासकीय अधिकार्‍यांमार्फत जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत भाजपचे नेते भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हणून आपलीच जाहिरात करीत आहेत. शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडणाऱ्या मोदी सरकारचा संकल्प रथ आमच्या गावात आणून आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम बंद करा, अशी भूमिका घेत अकोले तालुक्यातील अंबड गावच्या महिला सरपंच व उपसरपंचांसह ग्रामस्थांनी सोमवारी मोदी सरकारचा संकल्प रथ गावातून हुसकावला. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सरपंचासह ग्रामस्थांना धमकावल्यानंतर व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व भाजप समर्थकांच्या पुढाकारातून हा संकल्प रथ पुन्हा गावात आणून चित्रप्रदर्शन कार्यक्रम पार पाडला. मात्र या कार्यक्रमाकडे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाचे घसरलेले दर, निर्यात बंदीने कांद्याचे घसरलेले बाजारभाव, घरघुती गॅस सिलिंडरचा हजारांहून अधिक वाढलेले भाव व भरमसाठ वाढलेले पेट्रोल, डिझेल भाव, या व अन्य प्रश्नांवर अंबड गावच्या ग्रामस्थांनी मोदी सरकार संकल्प रथ गावात येताच अडवला. तुम्ही आम्हाला पूर्वकल्पना न देता हा संकल्प रथ प्रचारार्थ आणल्याचा आरोप सरपंच रेश्मा कानवडे यांनी रथासोबत आलेल्या अधिकार्‍यांवर केला. ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन चित्ररथ माघारी घेऊन जा, असा सल्ला त्यांनी दिला. उपसरपंचांसह उपस्थित ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त करून तीव्र विरोध करत ‘मोदी सरकार ऐवजी भारत सरकार’ असा उल्लेख करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी तर स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी आधी लागू करा मगच रथ गावात घेऊन या अशी भूमिका घेतली.

सोमवारी सकाळी 10 वाजता “मोदी सरकारची हमी संकल्प रथ” अंबड ग्रामपंचायत कार्यालयासमोर येताच सरपंच रेश्मा कानवडे, उपसरपंच नाथा भोर, ग्रामस्थ रामचंद्र हासे, किसन भोर, परिक्षीत भोर, कोंडीबा भोर, मधुकर भोर, शिवाजी जाधव व उपस्थित नागरिकांनी शासनाच्या अधिकाऱ्यांना अडवून धारेवर धरले. दुधाचे व कांद्याचे पडलेले भाव, गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकरी प्रचंड संतापलेले होते. सरपंच रेश्मा कानवडे यांनी संकल्प रथावर ‘मोदी सरकार ऐवजी भारत सरकार’ असा उल्लेख करावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा मगच रथ गावात घेऊन या, असे बजावले.

स्थानिक पातळीवरील प्रचंड विरोध लक्षात घेऊन अधिकार्‍यांनी अकोल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय करे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करून सरपंच रेश्मा कानवडे यांच्याबरोबर स्पीकरवर बोलणे करून दिले. ग्रामस्थ, गावात संकल्प रथ प्रचारार्थ थांबू देणार नाहीत, याची जाणीव पोलिसांना करून देण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदी सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. तसेच रथावर ‘मोदी सरकार नको तर भारत सरकार हवे, असे सुनावले. यावर पोलीस निरीक्षक करे यांनी सरपंच व उपस्थितांना केंद्र व राज्य शासनाच्या कार्यक्रमाला तुम्ही विरोध करता, तुम्ही पाकिस्तानचे आहात काय ? असे सुनावून तुम्हाला नसेल ऐकायचे तर ऐकू नका, पण संकल्प रथ गावात येऊ देणार नाही, ही भाषा चालणार नाही. मी तेथे गावात येतो मग पाहतो रथ कोण आडवतो ते, अशी तंबी दिली.

दरम्यान भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव तेथे आले. त्यांनी संबंधित शेतकऱ्यांसोबत चर्चा करून निर्माण झालेली परिस्थिती समजून घेतली. सर्वांची समजून काढून हनुमान मंदीर सभागृहात संकल्प रथ कार्यक्रम सुरू केला. यावेळी मोजके भाजप समर्थक हजर होते. मात्र सरपंच, उपसरपंच व गावकऱ्यांनी आपला निषेध व्यक्त करीत पाठ फिरवली.