सूरज चव्हाण ज्या दिवशी सत्तेच्या बाजूने जातील, तेव्हा मुश्रीफांप्रमाणे हसत बाहेर येतील; अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

मुंबई पालिकेतील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी कारवाई करत ईडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांना अटक केली आहे. कोरोना काळातील तथाकथित खिचडी घोटाळाप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर यात ईडीची एण्ट्री झाली. मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. चव्हाण यांनी ईडीला वेळोवळी तपासात सहकार्यही केले होते. त्यानंतरही ईडीने चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

उभ्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की सकाळ उजाडली की काही चांगली गोष्ट ऐकायला मिळेल, असे होत नाही. कोणाचा तरी बदला घेतलाय, सूड उगवलाय असे काही ऐकायला मिळते. सूरज चव्हाण चौकशीत सहकार्य करत आहेत. तरीही त्यांना अटक केली गेली. या प्रकरणातील काही आरोपी सरकारमध्ये आहेत. परंतु, त्यांच्यावर कारवाई नाही. एकाला अटक आणि दुसऱ्याला मोकळीक हे कशाचे द्योतक आहे? हा कोणता न्याय आहे? राज्यकर्त्यांची पावले हुकूमशाहीकडे वळली आहेत. रामराज्याच्या संकल्पनेत संविधान ही आपली गीता आहे. पण त्याचं उल्लंघन सुरू आहे. सूरज चव्हाण ज्या दिवशी सत्तेच्या बाजूने जातील तेव्हा हसन मुश्रीफांप्रमाणे हसत बाहेर येतील, असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केला आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये ज्यांचे मुंबईत घर नाही अशा मजुरांची जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तेव्हा महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला मान्यता दिली होती. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून खिचडी पुरविण्याचा उपक्रम राबवण्यात आला. पालिकेने 52 कंपन्यांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट दिले होते. यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. मिंधे सरकार आल्यानंतर याप्रकरणी सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून कारवाई सुरू आहे.
या प्रकरणात मिंधे गटाचे सचिव संजय म्हशीलकर यांच्या कंपनीचे नाव असूनही म्हशीलकर यांना तपास यंत्रणांकडून अभय देण्यात आले आहे. म्हशीलकर यांची कोणतीही चौकशी ईडी अथवा मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली नाही. याबाबतही सावंत यांनी टीका केली आहे.