नाम बडे और दर्शन खोटे, सलामीलाच BCCI-ICC बोल्ड, रिकाम्या स्टेडियमच्या साक्षीने पहिला सामना

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपची तिकीट विक्री सुरू होताच सर्व सामन्यांना सोल्ड आऊट प्रतिसाद लाभल्याचे उभे केलेले चित्र सलामीलाच फसवे ठरले. हिंदुस्थानच्या सामन्यांची तिकिटे तर काही केल्या बुक होत नव्हती. त्यातच सलामीच्या सामन्याला लाखांची गर्दी होणार, अशी हवा निर्माण करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात आयसीसी वर्ल्ड कपचा जगज्जेते आणि उपविजेते यांच्यात खेळला गेलेला सामना गर्दीच्या बाबतीत ‘नाम बडे आणि दर्शन छोटे’ नव्हे, तर ‘खोटे’ सांगणारा ठरला. रिकाम्या खुर्च्यांच्या साक्षीने इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना सामना दुर्दैवाने खेळावा लागला. मोठय़ा मोठय़ा बाता मारणारे आयसीसी-बीसीसीआय पहिल्याच सामन्यात तोंडघशी पडलेत. त्यामुळे पुढील सामन्यांसाठी खरी गर्दी जमवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आव्हान असेल.

तिकिटे सोल्ड आऊट नव्हे, बीसीसीआय बोल्ड आऊट

वर्ल्ड कपचे तिकिटिंग ऍप असलेल्या ‘बुक माय शोवर’ तिकिटांसाठी प्रचंड ट्रफिक असल्याचे वारंवार चित्र दिसत होते. हिंदुस्थानच्या सामन्यांची तिकिटे काही तासांतच संपली होती. तासन्ॊाdतास प्रयत्न करूनही तिकिटे न मिळाल्याची तक्रार लाखो चाहत्यांनी केली होती. हिंदुस्थानी सामन्यांप्रमाणे काही महत्त्वाचे सामने सोल्ड आऊट झाल्याचे ‘बुक माय शो’वर दिसत होते. यात सलामीच्या सामन्याचाही समावेश होता, पण आज सारेच फसवे ठरले आहे.

क्षमता 1 लाख 32 हजारांची; उपस्थिती 12 हजारही नव्हती

रोहित शर्मा वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येलाच म्हणाला होती की, सर्व संघांना भरभरून प्रेम मिळेल. प्रत्येक सामना प्रचंड गर्दीत खेळला जाईल,  पण आज प्रत्येक संध्येला अंधारी येईल इतका भ्रमनिरास इंग्लंड-न्यूझीलंड संघांचा झाला. उद्घाटनाचा सामना लाखाच्या गर्दीत खेळला जाईल, अशी हवा करण्यात आली होती, पण 1 लाख 32 हजार आसन क्षमतेच्या मोदी स्टेडियममध्ये 12 हजार प्रेक्षकही नव्हते. जर तिकिटे विकली गेली होती तर प्रेक्षक का आले नाहीत, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.

Shubman Gill – टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण

हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी फक्त हिंदुस्थानी संघाचे वेडे

हिंदुस्थानात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटबद्दल प्रचंड वेड असल्याचे जगजाहीर आहे. वर्ल्ड कपचा प्रत्येक सामना प्रचंड गर्दीत खेळला जाईल, अशी अपेक्षा होती. पण सलामीचा रिकाम्या खुर्च्यांचा सामना पाहिल्यानंतर हिंदुस्थानीप्रेमी फक्त टीम इंडियाचे चाहते आहेत. अन्य संघांच्या लढती पाहण्यात त्यांना फारसा रस नसल्याचे समोर आले आहे.

स्टेडियम रिकामे का? ‘बुक माय शो’ला विचारा

मोदी स्टेडियमवर तिकिटांसाठी मारामारी सुरू असल्याचेच सारखे बोलले जात होते. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची तिकिटे तर दुर्मिळ झाली आहेत. त्यासाठी लाखालाखाची बोली लावली जातेय. पण आज सलामीचा सामना प्रेक्षकांऐवजी रिकाम्या खुर्च्यांनी पाहिला. याबाबत गुजरात क्रिकेट स्टेडियमचे सचिव अनिल पटेल यांना विचारले असता ते म्हणाले, स्टेडियम रिकामे का ते ‘बुक माय शो’ला विचारा. आम्हाला याची काहीही कल्पना नसल्याचे म्हणत त्यांनी हातवर केले.

रिकाम्या स्टेडियममध्ये पत्रकारांवर अन्याय

वर्ल्ड कपच्या सलामीच्या सामन्याचे वृत्तांकन करण्यासाठी हिंदुस्थानातील सुमारे 400 पेक्षा अधिक क्रीडा पत्रकारांनी अर्ज केले होते. पण मोदी स्टेडियमच्या मीडिया बॉक्सची क्षमता ही 200 पेक्षा कमी असल्यामुळे आयसीसीने 200 पेक्षा अधिक पत्रकारांना सलामीच्या सामन्यासाठी प्रवेश नाकारले होते. या सामन्यासाठी अनेकांनी विमानाची तिकिटे आणि हॉटेल बुक केले होते. पण बुधवारी रात्री आयसीसीने शेकडो पत्रकारांना सामन्यासाठी जागा नसल्याचे कारण देत प्रवेश नाकारला होता. यामुळे क्रीडा पत्रकार जगतात आयसीसी आणि बीसीसीआयच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

फटके आणि फटाके- फायर है तू!